महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या आगामी चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात अनेक मातब्बर कलाकार दिसणार आहेत. तर त्यांच्याबरोबरच काही जण अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. सध्या या चित्रपटाची टीम या चित्रपटासाठी खूप घाम गाळत आहे. नियमित व्यायाम, योग्य आहार हे सगळं सांभाळून या चित्रपटासाठी सर्व कलाकार उत्तम शरीरयष्टी कमवत आहेत. आता यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या उत्कर्ष शिंदेची एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे. या चित्रपटात उत्कर्ष शिंदे सूर्याजी दांडकर यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग सध्या कोल्हापूरला सुरू आहे. उत्कर्ष नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. आता त्याने एक व्हिडीओ पोस्ट करून या चित्रपटाच्या शूटिंगच्या प्रक्रियेत त्याला अनेक गोष्टी शिकायला मिळत असल्याचं सांगितलं आहे. आणखी वाचा : Video: ज्योतिबाचं दर्शन, पंगतीत जमिनीवर बसून जेवण…; ‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या टीमचा व्हिडीओ चर्चेत उत्कर्षने त्याचा आणि सिद्धार्थ जाधवचा महेश मांजरेकरांच्या समोर जिममध्ये वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आणि लिहीलं, "कॅप्टन ऑफ द शिप महेश मांजरेकर सर जेव्हा जिममध्ये येतात तेव्हा दिवसभर रणरणत्या उन्हात, कधी घोडेस्वारी, तलवार बाजीचे सिन देऊन दमलेले आम्ही सर्व त्यांच्या येण्याने डबल जोशात व्यायाम करू लागतो. माझ्यासाठी हे शूटिंग आयुष्याला समृद्ध करणारं आहे. प्रवीण तरडे दादासारखा मोठा दिग्दर्शक,लेखक मोठ्या भावाप्रमाणे सदैव सोबत. त्यांच्या अनुभवाचे, स्ट्रगलचे किस्से खूप काही शिकवून जात आहेत. सिन कोणताही असो, मज्जा करत तो त्यांच्या असण्याने मस्त होतो." हेही वाचा : Video: “मूठभर मास अंगावर चढलं…”, उत्कर्ष शिंदेला आलेल्या अनुभवाने वेधले लक्ष, पोस्ट व्हायरल त्याने पुढे लिहीलं, "ज्याच्या अभिनयाला बघून अभिनय क्षेत्राची ओढ लागली तो सिद्धू दादा पिलरसारखा सोबत उभा आहे . जो सेटवरच गाईड करतो असं नाही तर जेवताना आठवणीने विचारपूस करतो, जिममध्येही तितकच बूस्ट करतो. गुरुतुल्य प्रवीण दादा, सिद्धू दादा, आणि महेश मांजरेंजकर सर. ह्यांच्याकडून होणाऱ्या प्रेमच्या आशीर्वादाच्या वर्षावात उत्कर्षचा उत्कर्ष होतोय." आता त्याची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून यावर प्रतिक्रिया देत चाहते त्याचं कौतुक करत आहेत.