‘सुभेदार’ हा चित्रपट गेले अनेक महिने खूप चर्चेत आहे. दिग्पाल लांजेकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आपल्याला या चित्रपटातून मोठ्या पाडद्यावर पाहायला मिळणार आहे. २५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटात विराजस कुलकर्णीही महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. पण शिवराज अष्टकातील या आधीच्या चित्रपटांसाठीही त्याने काम केलं असल्याचा खुलासा त्याने नुकताच केला.

या चित्रपटातून पहिल्यांदाच मृणाल कुलकर्णी, विराजस कुलकर्णी आणि त्याची पत्नी शिवानी रांगोळी हे तिघंही एकाच चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटामध्ये मृणाल कुलकर्णी जिजाबाईंच्या भूमिकेत, शिवानी यशोदाबाई मालुसरे यांच्या भूमिकेत, तर विराजस या चित्रपटामध्ये हेराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने याच्या टीमने नुकतीच ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली. यावेळी विराजसने त्याने दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’च्या आधीच्या ऐतिहासिक चित्रपटांसाठी ही काम केलं असल्याचा खुलासा केला.

हेही वाचा : “सुंदर शिवानीच्या शेजारी…”, विराजसचा बायकोसाठी हटके उखाणा, लेकाची कल्पकता पाहून मृणाल कुलकर्णीही थक्क

विराजस म्हणाला, “माझ्या शालेय वयामध्ये दिग्पाल दादा आम्हाला नाटक शिकवायला यायचा. ही गोष्ट साधारणतः २००३ किंवा २००४ सालची आहे. तेव्हाच त्याने आम्हाला सांगितलं होतं की माझे पणजोबा म्हणजे गो. नी. दांडेकर यांच्या ‘शिवकाल’ या कादंबऱ्यांवर आपल्याला आठ चित्रपट करायचे आहेत. त्यानंतर मी त्याच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये सामील झालो. तेव्हाही तो आम्हाला चित्रपटातील शॉट कसे असणार हे सांगायचा. तेव्हापासूनच हे चित्रपट कसे दिसतील हे त्याच्या डोक्यात होतं.”

आणखी वाचा : “वर्षं पटापट निघून जातील आणि…” विराजस-शिवानीच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवानिमित्त मृणाल कुलकर्णींनी केलेली पोस्ट चर्चेत

पुढे तो म्हणाला, “‘शिवराज अष्टका’शी सुरुवातीपासूनच माझा थोडाफार जवळचा संबंध होता. यातील पहिल्या एक-दोन चित्रपटांचा सब टायटलिंग मी केलं होतं. सध्या ही जी ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली आहे त्याची ‘फर्जंद’पासून सुरुवात झाली. त्यावेळी सगळ्या तंत्रज्ञांना स्क्रिप्ट नीट कळावी यासाठी आम्हाला एक वेगळा प्रयोग करायला लागला होता. चित्रपटाचे शूटिंग होण्याच्या आधी आम्हाला ते सगळं स्क्रिप्ट इंग्रजीत भाषांतर करायला लागलं होतं. त्यामुळे तेव्हापासून मी या चित्रपटांचा प्रवास बघत आलो आहे. तर आता पहिल्यांदाच तो दिग्दर्शक आणि मी अभिनेता असं त्याच्या चित्रपटामध्ये काम करता आलं आणि मला खूप मजा आली.”