प्रेम म्हणजे एका ओळीत व्यक्त करता येईल अशी व्याख्या नाही, तर तो एक अनुभव आहे. प्रेमाचा अनुभव घेतला की प्रेम ही संकल्पना उलगडत जाते. प्रेम या लहानशा वाटणाऱ्या शब्दामध्ये खूप काही दडलं आहे. त्यामुळे प्रेमाला चौकटीमध्ये बसवता येत नाही. याची अनेक रुपं आहेत. आई-वडीलांचं प्रेम, भावंडांमधील प्रेम, मित्र-मैत्रिणींचं प्रेम आणि प्रियकर प्रेयसीमधील प्रेम, अशी विविध रुपांमध्ये हे प्रेम खुलत असतं. मात्र कॉलेज जीवनात तरुणाईमध्ये अंकुरणारं प्रेम हे काही निराळचं असतं. अशाच कॉलेज जीवनात प्रेमाची सफर करणाऱ्या राहुल आणि पूजाचा प्रवास ‘प्रेमवारी’ या चित्रपटामध्ये मांडण्यात आला आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे हा ट्रेलर पाहून नेमकं प्रेम म्हणजे काय असतं हे दाखविण्यात आलं आहे.
राहुल आणि पूजा यांचं कॉलेजमध्ये फुलत जाणारं प्रेम, त्यांच्या प्रेमामध्ये अडसर ठरणाऱ्या काही गोष्टी, घरातल्यांचा विरोध यासारखे अनेक चढउतार आणि त्यावर या दोघांनी केलेली मात या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत. यापूर्वी देखील कॉलेज जीवन आणि त्यात होणारे प्रेम यावर आधारित अनेक चित्रपट येऊन गेले आहे. पण हा चित्रपट इतर चित्रपटापेक्षा नक्कीच वेगळा ठरणार आहे.
चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे मुख्य भूमिकेत झळकणार असून या चित्रपटाच्या माध्यमातून मयुरी कापडणेने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. येत्या ८ फेब्रुवारीला म्हणजेच ‘व्हॅलेंटाइन डे च्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. साईममित प्रोडक्शन निर्मित ‘प्रेमवारी’ या आगामी चित्रपटाद्वारे प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर येणार आहे. या चित्रपटाला मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक अमितराज याने संगीत दिले. या सुंदर चित्रपटाचे लेखन,निर्मिती आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून, प्रस्तुतकर्त्याची धुरादेखील त्यांनीच सांभाळली आहे.