Marathi Writer Post : राज्य सरकारकडून हिंदी सक्ती झाल्यानंतर राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. परिणामी, काही दिवसांत सरकारने हिंदी सक्तीविषयक जीआर मागे घेतला. जीआर मागे घेतल्यानंतर मोर्चाऐवजी विजयी मेळाव्याची घोषणा करण्यात आली आणि काल (दि. ५ जुलै) ‘विजयी मेळावा’ पार पडला.

या विजयी मेळाव्यानिमित्त सुमारे दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले. दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र एकाच मंचावर पाहिल्यानंतर कार्यकत्यांचा जोष पाहायला मिळाला. इतक्या वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आल्याने दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

ठाकरे बंधू एकत्र येताच केवळ कार्यकर्तेच नाहीतर मराठी कलाकारांनीसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. हेमांगी कवी, प्रथमेश परब, अजिंक्य ननावरे, शिवानी सुर्वे, रुचिरा जाधव, अमोल कोल्हे आणि किरण माने या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. या पोस्टमधून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. अशातच मराठी लेखक अरविंद जगताप यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

लेखक अरविंद जगताप इन्स्टाग्राम पोस्ट

अरविंद जगताप यांनी शेअर केलेली पोस्ट अशी आहे की, “भाऊ वेगळी झाले की, शेताचा बांध तुटतो. भाऊ एक झाले की अश्रूंचा बांध फुटतो. भाऊ एक झाले की शहराला बळ येतं गावाला तर येणारच एक व्हायचं. गावात दोन भाऊ एकत्र आले की सावकाराच्या तुकड्यांवर जगणारे दोनचार सोडले तर प्रत्येकाला आनंद होतो. गावासाठी एक होऊ.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अरविंद जगताप यांनी पोस्टमध्ये ठाकरे बंधू यांच्याबद्दल थेट उल्लेख केलेला नाही. पण त्यांच्या पोस्टवरुन ती ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दलच असल्याचं दिसत आहे. अरविंद जगताप यांनी शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी या पोस्टखाली “खूप छान”, “अगदी योग्य”, “अत्यंत समर्पक” अशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.