करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरात बिकट परिस्थिती निर्माण झालीय. या लाटेचा फटका अनेकांना बसलाय. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना गेल्या काही दिवसात करोनाची लागण झाली. यापैकीच एक म्हणजे बॉलिवूड अभिनेता आणि मॉडल मिलिंद सोमण. मिलिंद सोमणला करोनाची लागण झाल्यानंतर त्याने स्वत:ला क्वारंटाईन केलं. या काळात त्याने योग्य आहार आणि व्यायम करत करोनावर मात केली.
मिलिंद सोमण आता पूर्णपणे बरा झाला आहे आणि म्हणूनच मिलिंदने प्लाझ्मा डोनेट करण्याचा निर्णय घेतला. प्लाझ्मा देण्यासाठी तो मुंबईतील एका रुग्णालयात गेला. मात्र रुग्णालयातून त्याला डॉक्टरांनी प्लाझ्मा न घेताच घरी पाठवून दिलं. मिलिंद सोमणनेच त्याच्या इन्स्टाग्रामवरून याची माहिती दिलीय.
मिलिंदने एक फोटो शेअर केलाय. या तो म्हणाला, “पुन्ह एकदा जंगलात, मुंबईमध्ये प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी गेलो होतो. मात्र डोनेट करण्यासाठी माझ्यात पुरेश्या अँटीबॉडीज नाही. जरी प्लाझ्मा थेरपी ही शंभर टक्के प्रभावशाली असल्याचं सिद्ध झालेलं नाही. मात्र ही थेरपी उपचारासाठी मदत करते आणि त्यामुळे मी विचार केला आपण आपल्याला शक्य ते करू”
View this post on Instagram
पुढे मिलिंद म्हणाला, “अँटीबॉडीज कमी असण्याचा अर्थ मला अगदी सामान्य लक्षणं होती. त्यामुळे मी पुन्हा एकदा या संक्रमाणीशी लढू शकतो. मात्र इतर कुणाची मदत करू शकत नाही. जरा वाईट वाटलं” असं म्हणत मिलिंदने प्लाझ्मा डोनेट करता न आल्याचं दु:ख व्यक्त केलंय.
सोशल मीडियावर मिलिंद सोमणची ही पोस्ट व्हायरल होतेय. मिलिंदच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिलीय.सोशल मीडियावर मिलिंद चांगलाच सक्रिय असतो. खास करून फिटनेस संदर्भातील अनेक पोस्ट तो सोशल मीडियावर शेअर करतो.