Best Crime Thriller Series On OTT : ओटीटीवर हल्ली विविध जॉनरच्या वेब सीरिज पाहायला मिळतात. पण, जर तुम्हाला सस्पेन्स, अॅक्शन असलेल्या सीरिज आवडत असतील, तर ओटीटीवरील ‘या’ सीरिज तुमच्या वॉच लिस्टमध्ये असायलाच हव्या. यादीतील सर्व सीरिज ‘जिओ हॉटस्टार’वर पाहता येतील. वाचा, यादी…
द नाईट मॅनेजर – ‘द नाईट मॅनेजर’मध्ये आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळतात. यामध्ये आदित्य रॉय कपूर एका माजी नौदल अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळतो. जो तस्करीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या (अनिल कपूर) जाळ्यात अडकतो. कथेत प्रत्येक टप्प्यावर धक्कादायक आणि रंजक वळण आल्याचं पाहायला मिळतं. दमदार अभिनय आणि उत्कृष्ट सिनेमॅटॉग्राफी असलेली ही सीरिज ओटीटीवरील उत्कृष्ट थ्रिलर सीरिजपैकी एक आहे. संदीप मोदी यानं या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.
Rudra : the edge of darknes – या सीरिजमध्ये अजय देवगण, रश्मिका दुग्गल, ईशा देओल हे कलाकार मुख्य भूमिकांत असून, राजेश मापुसकर यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे. ब्रिटिश शो Luther पासून प्रेरित असलेल्या या सीरिजमधून अजय देवगणनं ओटीटीवर पदार्पण केलं. त्यामध्ये अभिनेत्यानं डीसीपी रुद्रवीर सिंहची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे अजय देवगणने एका अशा पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे, जो इतर गुन्हेगारांच्या डोक्यात काय चाललंय, त्यांचे डावपेच काय आहेत हे ओळखतो; पण खासगी आयुष्यात तो स्वत: एका परिस्थितीत अडकलेला असतो. या सीरिजच्या प्रत्येक एपिसोडमध्ये एक नवीन केस आणि नवीन सस्पेन्स असल्याचं पाहायला मिळतं.
असुर – अर्शद वारसी, बरुन सोबती, अनुप्रिया गोयंका यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या या सीरिजचं दिग्दर्शन ओनी सेननं केलं आहे. ‘असुर’ भारतीय पौराणिकता आणि सायकॉलॉजिकल क्राइम थ्रिलर यांचं अनोखं समीकरण आहे. ही गोष्ट एका अशा फॉरेन्सिक एक्स्पर्टची आहे, जो त्याच्या सहकाऱ्याबरोबर मिळून एका अशा सीरियल किलरच्या शोधात असतो, जो स्वत:ला कालीचा अवतार समजतो. ही सीरिज अपराधाव्यतिरिक्त नैतिकता आणि आस्था यांवरही प्रश्न निर्माण करणारी आहे.
काला – यामध्ये अविनाश तिवारी, नितीन महेश जोशी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. कोलकाताच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘काला’ ही एक थरारक वेब सीरिज आहे. त्यात इंटेलिजन्स ब्यूरोतील एका अधिकाऱ्याची गोष्ट सांगण्यात आली आहे. उत्तम कथा, अॅक्शन व भावनिक संघर्षाचे कंगोरे असलेली ही सीरिज एका अधिकाऱ्याच्या कर्तव्य आणि कुटुंब यामधील संघर्षाची योग्य रीतीनं मांडणी करते. या सीरिजमधून प्रेक्षकांना थरार, उत्कंठा व भावनिक गुंतवणुकीचा एकत्रित अनुभव पाहायला मिळेल.
मर्डर इन माहिम – विजय राज, आशुतोष राणा, शिवाजी साटम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या या सीरिजचं दिग्दर्शन राज आचार्य यांनी केलं आहे. मुंबईच्या माहिम भागात घडलेल्या घटनेवर आधारित ही सीरिज LGBTQIA+ कम्युनिटीवर लक्ष्य करून करण्यात आलेल्या सीरियल मर्डर्सच्या तपासावर आधारित आहे. दोन जुने मित्र, एक पोलीस अधिकारी व एक पत्रकार पुन्हा एकत्र येतात; पण त्यांच्या या प्रवासात समाजात खोलवर दडलेले भेदभाव समोर येतात. ही केवळ एक क्राइम सीरिज नसून, एक संवेदनशील कथा आहे.