Bollywood Horror Commedy Movies To Watch On Ott : हॉरर-कॉमेडी चित्रपटांचा एक वेगळा चाहतावर्ग असतो. तरुणांमध्ये विशेषतः या जॉनरच्या चित्रपटांची विशेष क्रेझ असते. हल्ली ओटीटीवर अनेक प्रकारच्या जॉनरचे चित्रपट प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध असतात. अशातच आता आम्ही तुम्हाला ओटीटीवरील अशा काही हॉरर-कॉमेडी चित्रपटांची नावं सांगणार आहोत, जी पाहताना तुम्हाला भीती तर वाटेल पण तुम्ही पोट धरून हसाल हे नक्की.
‘भूल भुलैया’ ते ‘स्त्री’ बॉलीवूडमधील असे काही हॉरर-कॉमेडी चित्रपट आहेत जे हॉरर जॉनर आवडणाऱ्या प्रत्येकाने पाहायला हवे. चला तर जाणून घेऊयात कोणते आहेत ते चित्रपट…
‘स्त्री’
बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘स्त्री’ चित्रपट बॉलीवूडमधील हिट झालेल्या हॉरर चित्रपटांपैकी आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा प्रदर्शित झाला असून या चित्रपटात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, नोरा फतेही, पंकज त्रिपाठी यांसारखे कलाकार पाहायला मिळतात. २०१८ मध्ये याचा पहिला भाग प्रदर्शित झालेला तर दुसरा भाग ‘स्त्री २’ २०२४ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट ‘प्राईम व्हिडीओ’वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे आणि हा हॉरर व कॉमेडी या जॉनरचं भन्नाट समीकरण आहे.
‘भूत पोलिस’
सैफ अली खान व अर्जुन कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘भूत पोलिस’ हा सिनेमा २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचं दिग्दर्शन पवन कृपलानी यांनी केलेलं. यामध्ये सैफ अली खान व अर्जुन कपूर यांच्याबरोबर अभिनेत्री यामी गौतम व जॅकलिन फर्नांडिसही महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळतात. ही दोन भावांची गोष्ट आहे, जे भूत प्रेतासारख्या गोष्टींमधून स्वत:ला लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात. हा चित्रपट ‘जिओ हॉटस्टार’वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
‘फोन भूत’
२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफ, अभिनेता इशान खट्टर, सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहेत. गुरमीत सिंगने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं. हा चित्रपट ‘अमॅझॉन प्राईम’वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
‘गो गोवा गॉन’
राज आणि डीके दिग्दर्शित ‘गो गोवा गॉन’ चित्रपटात अभिनेता सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहे, तर यामध्ये त्याच्यासह कुणाल खेमू, वीर दास महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. २०१३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झालेला. या चित्रपटातील कथा गोवा येथील एका पार्टीत जाणाऱ्या तीन मित्रांच्या अवती भोवती फिरते. ‘अमॅझॉन प्राईम व्हिडीओ’वर हा चित्रपट पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
‘भूल भुलैया’
‘भूल भुलैया’ हा बॉलीवूडमधील गाजलेल्या हॉरर-कॉमेडी चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचे आतापर्यंत तीन भाग प्रदर्शित झाले आहेत. पहिला भाग २००७ मध्ये प्रदर्शित झालेला, ज्यामध्ये अभिनेता अक्षय कुमार, विद्या बालन आणि शाइन आहुजा महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. त्यानंतर २०२२ मध्ये या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. ‘भूल भुलैया २’मध्ये कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू मख्य भूमिकेत होते. यानंतर २०२४ मध्ये या चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित झाला, ज्यामध्ये कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित हे कलाकार झळकले. या चित्रपटाचे तिन्ही भाग ‘प्राईम व्हिडीओ’ आणि ‘जिओ हॉटस्टार’वर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.