The Bads Of Bollywood Tamannaah Bhatia Dance Video : सध्या हिंदी मनोरंजनसृष्टीत आर्यन खान दिग्दर्शित ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ सीरिजची जोरदार चर्चा चालू आहे. या सीरिजच्या निमित्ताने आर्यनने बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आहे. या सीरिजचे एपिसोड्स प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहेत.
शाहरुख खानच्या लाडक्या लेकाला त्याच्या पहिल्या प्रोजेक्टमध्ये पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण सिनेसृष्टी एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. स्वत: शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान ते इम्रान हाश्मीपर्यंत ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’मध्ये सगळ्याच कलाकारांचे छोटे-छोटे जबरदस्त कॅमिओ आहेत. याशिवाय या सीरिजच्या प्रमोशनसाठी तमन्ना भाटियाचं खास आयटम साँग लॉन्च करण्यात आलं होतं.
गाण्याबाबत ‘असा’ आहे ट्विस्ट
तमन्ना भाटियाचं ‘गफूर’ गाणं ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ ही सीरिज प्रदर्शित होण्यापूर्वीच चाहत्यांना सर्वत्र पाहायला मिळालं होतं. मात्र, प्रत्यक्ष सीरिजमध्ये हे गाणं नाहीये. सोशल मीडियावर याबाबत चर्चा चालू झाल्यावर यामागचं मूळ कारण निर्मात्यांनी नुकतंच स्पष्ट केलं. तमन्नाचं ‘गफूर’ हे आयटम साँग फक्त सीरिजच्या प्रमोशनचा एक भाग होतं त्यामुळे हे गाणं मूळ सीरिजमध्ये नाहीये असं स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, चाहत्यांसाठी आता या गाण्याचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
‘गफूर’ गाण्यात ३ खलनायकांची झलक
‘गफूर’ गाण्यात तमन्नाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. याशिवाय यामध्ये रणजीत, शक्ती कपूर आणि गुलशन ग्रोव्हर असे तीन खलनायक देखील झळकले आहेत. शिल्पा राव आणि उज्ज्वल गुप्ता यांनी हे गाणं गायलं असून हे गाणं शाश्वत सचदेव यांनी लिहून कंपोझ सुद्धा केलं आहे.
‘गफूर’ गाण्यात नेहमीप्रमाणे तमन्ना जबरदस्त एनर्जीने डान्स करत असल्याचं चाहत्यांना पाहायला मिळत आहे. या गाण्याची दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर फराह खान आहे.
दरम्यान, प्रेक्षकांनी या गाण्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “तमन्ना इज फायर”, “हे गाणं सीरिजमध्ये असायला पाहिजे होतं”, “तमन्नाचं गाणं अलीकडच्या प्रत्येक बॉलीवूड सिनेमांमध्ये असतंच”, “वॉव तमन्ना Killed it” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.