Human rights panel urges case against Ranbir Kapoor: आर्यन खान दिग्दर्शित ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरिजची गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा होती. शाहरुख खानच्या मोठ्या मुलाने दिग्दर्शक म्हणून या वेब सीरिजमधून पदार्पण केले आहे.
‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’मध्ये अनेक कलाकार दिसले आहेत. शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, एसएस राजामौली, बादशाह, रणवीर सिंग, सिद्धांत चतुर्वेदी, करण जोहर, सारा अली खान, राजकुमार राव, दिशा पटानी यांची झलकदेखील पाहायला मिळत आहे.
याबरोबरच बॉबी देओल, मोना सिंग, लक्ष्य, राघव जुयाल हे कलाकारदेखील प्रमुख भूमिकेत दिसले आहेत. रणबीर कपूरची भूमिकादेखील या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळत आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची कारवाईची मागणी
१८ सप्टेंबर २०२५ ला प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजचे एकीकडे कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र यावर संकट ओढवल्याचे दिसत आहे. रणबीर कपूरच्या एका सीनमुळे समस्या निर्माण झाल्याचे समोर आले आहे.
‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या एका सीनमध्ये रणबीर कपूर ई-सिगारेट ओढताना दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे तो सिगारेट ओढत असताना कोणतीही चेतावणी अथवा डिस्क्लेमर दिला नाही, अशी तक्रार विनय जोशी यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे केली. या सीनमुळे इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा, २०१९ चे उल्लंघन केले आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मुंबई पोलिसांना इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा, २०१९ चे उल्लंघन करून त्याची जाहिरात, शूटिंग किंवा प्रमोशन केल्याबद्दल अभिनेता रणबीर कपूर आणि ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या वेब सीरिजच्या निर्मात्यांवर गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे.
आयोगाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांना योग्य ती कारवाई करण्यासाठी आणि तरुण पिढ्यांवर चुकीचा प्रभाव टाकू शकणाऱ्या अशा कंटेंटवर तात्काळ बंदी घालण्याची नोटीस बजावली.
याबरोबरच मुंबई पोलिस आयुक्तांना इलेक्ट्रॉनिक सिगारेटचे उत्पादक आणि आयातदार यांच्या कामकाजाची चौकशी सुरू करण्यास सांगण्यात आले आहे.