परेश रावल हे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ते भाजपा खासदारही होते. याबरोबरचं परेश स्वतःचं मत कायम निर्भीडपणे मांडत असतात. राजकीय भूमिका घेणं किंवा मत मांडणं यामुळे परेश रावल हे कायम चर्चेत असतात. नुकतंच गुजरात निवडुकीदरम्यान प्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून उडालेला गोंधळ आपण अनुभवला आहे. शिवाय यामागची त्यांची बाजूदेखील त्यांनी स्पष्टपणे मांडली आहे.

चित्रपटात येण्यापूर्वी परेश रावल यांनी गुजराती रंगमंचावरसुद्धा भरपूर काम केलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम सोहळ्यात परेश यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी उपस्थित प्रेक्षकांशी मनमोकळा संवाद साधला आणि मराठी मनोरंजनसृष्टी आणि नाट्यसृष्टीचं तोंडभरून कौतुक केलं.

आणखी वाचा : “कितीही पैसे दिले तरी मी साडी नेसून…” जेव्हा राजेश खन्ना यांनी ‘त्या’ गाण्यावरून उडवली अमिताभ बच्चन यांची खिल्ली

मराठी नाट्यसृष्टी आणि मराठी कलाकार यांच्याविषयी बोलताना हात आखडता न घेता परेश रावल यांनी कौतुक केलं. “मराठी नाट्यसृष्टीतील अत्यंत हेल्दी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते, आधीच्या काळातसुद्धा असंच चित्र पाहायला मिळायचं. कित्येक गुजराती कलाकार मराठी नाटकं आवर्जून बघायला जायचे. गुजराती नाट्यसृष्टीत ९०% नाट्य हे मराठीतूनच येतं. जेवढे कलाकार, जेवढे लेखक जेवढ्या निर्मिती संस्था मराठी नाट्यसृष्टीत आहे तेवढी संख्या गुजरातीमध्ये पाहायला मिळत नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याविषयी खंत व्यक्त करत परेश रावल म्हणाले, “कधीकधी या गोष्टीचं वाईट वाटतं, इर्षेची भावनादेखील निर्माण होते पण किमान मराठी नाट्यसृष्टीतून बरंच काही शिकायला मिळतंय याचं समाधानही आहे. मराठी नाट्यसृष्टी ही खूप समृद्ध आहे.” परेश रावल यांनी विविधांगी भूमिका साकारुन गेली अनेक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आता ते ‘शहजादा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.