खिलाडी अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. एकेबाजूला हा चित्रपट प्रेक्षकांची पसंती मिळवत असतानाच अक्षय आता आपल्या जुन्या भूमिकेत गेला आहे. एक आदर्श पती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याने आपल्या पत्नीला म्हणजेच ट्विंकल खन्नाला किचनपासून थोडी उसंत देण्याचे ठरवले. त्यांच्या घरी काही पाहुणे येणार होते. त्यामुळे ट्विंकलला आराम देऊन अक्षयने स्वतःचा ‘शेफ’ची टोपी घातली. विशेष म्हणजे किचनमध्ये त्याला साथ मिळाली ती मुलगा आराव कुमार याची. या बाप – लेकाच्या कामामुळे ट्विंकलला बराच आनंद झाल्याचे दिसते.

अभिनेत्री आणि आता लेखिका झालेल्या ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर शेफ पिता – पुत्राचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत तिने लिहिलंय की, रात्रीच्या जेवणाला आमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी जेवण बनवण्यात पिता – पुत्र व्यस्त आहेत.

या फोटोला दिलेली कॅप्शन आणि फोटो पाहता बॉलिवूडमधील या कुटुंबाने अक्षयच्या ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ चित्रपटाचे यश साजरे करण्यास सुरुवात केल्याचे दिसते. अक्षय हा एक उत्तम पती आणि पिता असल्याचे वेळोवेळी त्याच्या वागण्या – बोलण्यातून दिसले आहे. वर्षभरात अक्षयने भलेही कितीतरी चित्रपट केले असले तरी कुटुंबाकडे त्याने कधीच दुर्लक्ष केले नाही. कामासोबतच आपल्या कुटुंबालाही तो तितकाच वेळ देतो. त्यानुसार, तो आपल्या कामाचे वेळापत्रकही ठरवतो.

काही दिवसांपूर्वीच अक्षय आणि त्याचे कुटुंब हॉलिडेसाठी लंडनला गेले होते. त्यावेळी त्याने नितारासोबत घालवलेल्या काही सुंदर क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.