मराठीमधला बहुप्रतिक्षीत असा ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर ‘ हा चित्रपट दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारली आहे ती अभिनेता सुबोध भावे यानं. बालगंधर्व, लोकमान्य टिळक यांच्या चरित्रपटात सुबोधनं भूमिका साकारली त्यामुळे चरित्रपटाचा मोठा अनुभव सुबोधच्या गाठीशी आहे, असं असलं तरी डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका करिअरमधली सर्वात अवघड भूमिका असल्याचं सुबोधला वाटतं.
‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर ‘ हा चित्रपट स्वीकारणं खूप सोप्पी गोष्ट होती मात्र यामध्ये काशिनाथ यांची भूमिका साकरणं तितकंच अवघड होतं. कारण मी त्यांना कधीही प्रत्यक्षात पाहिलं नव्हतं, त्यांची नाटकंही पाहिली नव्हती. १९८६ साली ते वारले त्यामुळे भेटण्याचाही योग आला नाही. ते मराठी रंगभूमिवरचे सर्वोत्तम नट होते त्यामुळे अशा मोठ्या नटाची भूमिका साकारणं खूपच अवघड होतं, असं सुबोध ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना म्हणाला.
‘विक्रम गायकवाड यांच्या रंगभूषा कौशल्यामुळे डॉक्टरांसारखा मी दिसू लागलो. मात्र रंगभूमीवरचा तो सुवर्णकाळ पुन्हा उभा करणं आणि त्यांच्यासारखाच अभिनय साकारणं हे मात्र आव्हानात्मक होतं. सुरवातीला या भूमिकेसाठी त्यांचे सिनेमे पाहिले त्यांच्याबद्दल वाचायलाही सुरुवात केली, मात्र नंतर मी दिग्दर्शकांच्या नजरेतून डॉ. घाणेकर साकारायला सुरूवात केली. आतापर्यंत मी अनेक भूमिका साकारल्या, मात्र ही भूमिका सर्वात अवघड होती. आजही ही भूमिका लोकांना आवडणार की नाही याचा विचार करून भीती वाटते असं म्हणत सुबोधनं या भूमिकेविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं. अभिजित देशपांडे दिग्दर्शित हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.