पायरसी रोखण्यात पोलीस अपयशीच

सध्या असलेल्या कामाच्या ताणामध्ये पायरसीला प्राधान्य देणे शक्य नसल्याचे काही अधिकारी सांगतात.

‘सैराट’च्या निमित्ताने पुन्हा एकदा मुद्दा ऐरणीवर

‘सैराट’ला पायरसीचा फटका बसल्याने चित्रपटांच्या पायरसीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकीकडे डाऊनलोडिंग संकेतस्थळ टोरंट भारतीय तपासयंत्रणांना दाद देत नसताना, स्थानिक पातळीवरून होणाऱ्या पायरसीचा शोध घेण्यातही मुंबई पोलिसांना अपयश येत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. ‘शाळा’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘नटसम्राट’ यांच्या पायरसीच्या तक्रारी होऊनही त्यांच्या सूत्रधारांना पोलिसांना अटक करता आलेले नाही. पोलीस यंत्रणाच नव्हे तर सरकारच्या दृष्टीनेही पायरसी रोखणे प्राथमिकता नसल्याने चित्रपटांना भविष्यातही असाच फटका बसत राहील, अशी प्रतिक्रिया चित्रपटसृष्टीकडून व्यक्त होत आहे.

चार दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ने राज्यात प्रेक्षकांना भुरळ घातली असतानाच, चित्रपटाची पायरेटेड कॉपी लीक झाल्याचे निर्मात्यांच्या लक्षात आले.

दिग्दर्शक-निर्माते यांनी पोलिसांकडे धाव घेत याची तक्रार करून पायरसी कोणी केली, याचा तपास घेण्याची विनंती केली आहे. परंतु आतापर्यंतचा अनुभव पाहता पोलिसांना पायरसीच्या सूत्रधारांपर्यंत पोहोचणे शक्यच होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. सन २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘शाळा’ अवघ्या काही दिवसांमध्ये यूटय़ूबवर झळकला तर त्यानंतर ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘किल्ला’, ‘नटसम्राट’ या चित्रपटांची पायरसी झाल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती.

डॉ. आमटे चित्रपटाच्या पायरसीच्या तपासात सायबर पोलिसांनी दोन जणांचा मागही काढला होता, परंतु आजपर्यंत गुन्ह्य़ात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. इतर चित्रपटांच्या बाबतीत तितकी प्रगतीही पोलीस यंत्रणांना गाठता आली नाही.

त्याचे प्रमुख कारण हे डाऊनलोडिंग संकेतस्थळ टोरंटचा असहकार असे पोलिसांकडून सांगण्यात येते. परदेशी सव्‍‌र्हरवरून चित्रपट अपलोड होत असल्याने त्याविषयी माहिती मिळविण्यासाठी तपास यंत्रणांना टोरंटकडे माहिती मागावी लागते. परंतु टोरंट पोलिसांना दाद देत नाही, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दुसरीकडे चित्रपटाची पायरसी एडिटिंग लॅब तसेच सेन्सॉर बोर्डापर्यंत पोहोचवतानाही झाल्याची उदाहरणे आहेत. परंतु सध्या असलेल्या कामाच्या ताणामध्ये पायरसीला प्राधान्य देणे शक्य नसल्याचे काही अधिकारी सांगतात.

राज्य-केंद्र सरकार जोपर्यंत पायरसीविरोधात कडक धोरण तयार करत नाही तोपर्यंत पायरसी सुरूच राहील, असे पोलीस हतबलपणे सांगतात.

पायरसीसंदर्भात तक्रार केल्यानंतर पोलीस सहकार्य करतात, मात्र त्याचा म्हणावा तसा परिणाम होत नाही. ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ हा चित्रपट तीनदा सेन्सॉर करावा लागला होता. त्या वेळी त्याची सेन्सॉर कॉपी पायरेटेड उपलब्ध झाली होती. त्याविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल करून शोधही घेतला. सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चौकशीही करण्यात आली होती. मात्र त्या चित्रपटाची कॉपी बाहेर कशी पडली हे समजू शकले नाही. कित्येकदा चित्रपटाची कॉपी परदेशात विकली जाते, त्यामुळे परदेशातील सव्‍‌र्हरवर तो उपलब्ध झाला असल्याचे कळते. पण इथून तो परदेशात क सा पोहोचला, याचा अजूनही शोध लागलेला नाही.

– समृद्धी पोरे, दिग्दर्शक

मराठी चित्रपटांचा व्यवसाय हिंदीपेक्षा जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर पायरसीचे प्रमाण खूप वाढले आहे. ‘टाइमपास २’, ‘एलिझाबेथ एकादशी’च्या वेळी पायरसीची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी लगोलग कारवाई करून पायरेटेड चित्रपट उपलब्ध असलेल्या साइट्स बंद पाडल्या होत्या. कुठल्या माध्यमावर त्या उपलब्ध होतात हे त्यांना कळते आणि त्यादृष्टीने ते कारवाई करतात, मात्र चित्रपटाची मूळ प्रत बाहेर कशी, कोणाकडून जाते हे शोधणे पोलिसांना शक्य होत नाही.

–  नितीन केणी, झी स्टुडिओ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Police failed to stop piracy of movie