Prahlad Kakkar on Aishwarya Rai and salman khan Breakup :सलमान खान व ऐश्वर्या राय यांच्यातील ब्रेकअपची २००२ मध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. जेव्हा त्यांचे ब्रेकअप झाले तेव्हा खळबळ उडाली. सलमानचे मन दुखावले गेले. त्याच्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. तर, ऐश्वर्या या संपूर्ण प्रकरणावर काहीही बोलली नाही.

जेव्हा सलमान आणि ऐश्वर्याचे नाते सर्वांत वाईट स्थितीत होते, तेव्हा दिग्दर्शक प्रल्हाद कक्कर या अभिनेत्रीबरोबर होते. ते एकाच इमारतीत राहत होते. प्रल्हाद कक्कर यांनी सलमानबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या होत्या. आता ते ऐश्वर्याबद्दल बोलले आहेत. ते म्हणतात की, ही अभिनेत्री खूप खासगी व्यक्ती आहे. तिला कोणाशीही सहजगत्या मोकळेपणाने बोलणे आवडत नाही. ती फक्त तेव्हाच तिच्या मनातील भावना शेअर करते जेव्हा ती कोणाशीही आरामदायी असते.

प्रल्हाद कक्कर यांनी एएनआयशी बोलताना सांगितले, “ज्या लोकांचा ऐश्वर्याशी संपर्क नव्हता, ते तिच्याबद्दल नकारात्मक गोष्टी बोलले. ऐश्वर्या नेहमीच पत्रकार परिषदांमध्ये बोलणे पसंत करते. जेव्हा तिचे सलमानशी भांडण झाले तेव्हा ती सार्वजनिकरीत्या एकही शब्द बोलला नाही. कारण- ती तिची प्रतिष्ठा आहे.”

प्रल्हाद कक्कर पुढे म्हणाले, “तिला लहानपणापासूनच कळले की, तिचे शांत राहणे ही तिची प्रतिष्ठा व ताकद आहे. आणि हेच अनेक लोकांना त्रास देत होते. म्हणून ते सतत तिला कमी लेखत होते आणि तिच्यावर टीका करीत राहिले. परंतु, ती खूप शांत राहिली, काहीच बोलली नाही.”

प्रल्हाद कक्कर सलमानबद्दल काय म्हणाले?

प्रल्हाद कक्कर यापूर्वी ऐश्वर्या आणि सलमानमधील तुटलेल्या नात्याबद्दल बोलले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी खुलासा केला होता की, सलमान अनेकदा ऐश्वर्याच्या घराबाहेर भिंतीवर डोके आपटून तमाशा करायचा. त्यांच्या मते, जेव्हा त्यांचे नाते संपले तेव्हा ऐश्वर्या आणि तिच्या कुटुंबासाठी तो एक मोठा दिलासा होता. सर्वांनी सलमानची बाजू घेतल्याने आणि तिच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अभिनेत्री खूप नाराज होती.