ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वहिदा रेहमान यांनी आपल्याला खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसंच देवआनंद यांच्या वाढदिवस ज्या दिवशी असतो त्याच दिवशी आपल्याला हा पुरस्कार जाहीर झाला याचा विशेष आनंद असल्याचंही त्यांनी म्हटलं. वहिदा रेहमान या भारतीय सिनेसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. १९५७ पासून त्या हिंदी सिनेसृष्टीत आल्या. त्यांनी गुरुदत्त, देवआनंद, राज कपूर, दिलीप कुमार, राज कुमार अशा सगळ्या दिग्गजांसह काम केलं आहे. तसंच त्यांची सेकंड इनिंगही यशस्वी ठरली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी X (ट्विटर) वर पोस्ट करत वहिदा रेहमान यांचं कौतुक केलं आहे.

काय म्हटलं आहे राज ठाकरेंनी?

वहिदा रहमान ह्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. १९५६ ला राज खोसला ह्यांच्या ‘सीआयडी’ सिनेमातून करिअरला सुरुवात करत ते आजच्या तारखेपर्यंत सक्रिय असणाऱ्या वहिदाजी ह्या भारतीय सिनेमाचा जवळपास ६० वर्षांचा इतिहास आहे. तुम्ही जे निवडता, त्यावर तुमची श्रद्धा असेल आणि कामाप्रती निष्ठा असेल तर तुम्ही अगदी पहिल्या दिवसापासून तुमचे नियम लोकांना स्वीकारायला लावू शकता हे वहिदाजींनी दाखवून दिलं.

पहिल्याच सिनेमात त्यांनी एका सीनसाठी मी वेडेवाकडे कपडे घालून शॉट देणार नाही असं ठासून सांगितलं. पहिलाच सिनेमा आहे, डायरेक्टर जे सांगेल ते ऐकलं पाहिजे इत्यादी गोष्टींना बाजूला सारत, मी जर ह्या क्षेत्रांत टिकणार असेन तर माझ्या तत्वांशी मी तडजोड करणार हे नाही हे सांगणं सोपं नाही, पण ते वहिदाजींना जमलं. स्वतःचं मुस्लिम नाव आडनाव पण लपवण्याच्या भानगडीत त्या कधी पडल्या नाहीत आणि त्यांचं हिंदुस्थानीपण इतकं पक्क होतं की त्यांचा धर्म लोकांच्या मनाला शिवलं पण नाही. अशा व्यक्तीला हा सन्मान मिळणं ह्यासारखी आनंदाची गोष्ट नाही, अर्थात वहिदाजीच नाहीत तर कुठल्याही कलाकाराला हे पुरस्कार थोडे आधी मिळायला काहीच हरकत नाही. पण असो.
वहिदाजींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतफे मनःपूर्वक शुभेच्छा !

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वहिदा रेहमान यांचा जन्म तामिळनाडूतल्या चेंगलपेट गावात १९३८ मध्ये झाला. हे गाव आता मद्रास या शहराचे उपनगर आहे. त्यांनी त्यांची कारकीर्द तमीळ आणि तेलुगू चित्रपटांपासून सुरु केली. मात्र त्यांना प्रसिद्धी मिळाली ती हिंदी चित्रपटांमधील अभिनयामुळेच.वय कमी असल्याने चित्रपटाच्या करारावर सहीदेखील करण्यास त्यांना कायद्याने मुभा नव्हती. तसंच तू तुझं नाव बदलून घे असा सल्ला त्यांना गुरुदत्त यांनी दिला होता. मात्र त्यांनी तो सपशेल नाकारला. मला त्यावेळी दिलीप कुमार आणि अन्य एका कलाकाराचं उदाहरण देण्यात आलं होतं. गुरुदत्त माझं नाव बदलण्यासाठी आग्रही होते. मात्र मी साफ नकार दिला. गुरुदत्तना हे वाटत होते की माझं नाव न भावणारे होतं. पण मी नाव बदलणार नाही हे त्यांना सांगितलं. मी माझ्या निर्णयावर खंबीर राहिले. त्यामुळे माझी ‘सीआयडी’ चित्रपटासाठी निवड करण्यासाठी गुरूदत्त आणि राज खोसला यांना तीन दिवस लागले. १९५६ साली आलेला हा त्यांचा पहिला चित्रपट होता. ‘गाईड’, ‘प्यासा’ आणि ‘कागज के फूल’ हे आपले आवडते चित्रपट असल्याचेही वहिदा रेहमान यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.