Rj Mahvash Shares Emotional Post For Yuzvendra Chahal: यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबी संघाने पंजाब किंग्सला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरले. आरसीबीचे सर्व स्तरातून कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आरजे माहवशने पंजाब किंग्स व युजवेंद्र चहलचे कौतुक करणारी पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
आरजे माहवशची युजवेंद्र चहलसाठी भावुक पोस्ट
२०२५ च्या आयपीएल सामन्यांदरम्यान आरजे माहवश चांगलीच चर्चेत राहिली. आता तिने युजवेंद्र चहलसाठी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. आरजे माहवशने सोशल मीडियावर आयपीएलदरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने लिहिले, “पंजाब किंग्स ही टीम लढली, टिकली आणि अगदी शेवटपर्यंत खेळली.”
युजवेंद्र चहलबाबत तिने लिहिले, “लोकांना माहीत नाही की दुसऱ्याच मॅचमध्ये त्याच्या बरगड्यांमध्ये फ्रॅक्चर झाले होते. त्यानंतर त्याच्या उजव्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले होते. या माणसाला संपूर्ण सीझनमध्ये तीन फ्रॅक्चर होते, तरीही तो खेळला आहे. वेदनेमुळे त्याला रडताना, ओरडताना पाहिले आहे, पण त्याला कधी हार मानताना पाहिले नाही. तो योद्ध्यासारखं खेळला.”
पुढे माहवशने लिहिले, “अगदी शेवटच्या बॉलपर्यंत टीम खेळत राहिली. यावर्षी या टीमला पाठिंबा देणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. मुलांनो, तुम्ही उत्तम खेळलात. या फोटोंमध्ये जे लोक आहेत, ते माझ्या हृदयाच्या जवळचे आहेत, पुढच्या वर्षी भेटूयात.”
आरसीबीचे अभिनंदन करत माहवशने लिहिले, “आरसीबी व या टीमच्या चाहत्यांचे अभिनंदन. सगळ्यांनीच खूप मेहनत केली आणि छान खेळले. क्रिकेट आणि आयपीएल खरंच आपल्या भारतीयांसाठी एक सण आहे”, असे म्हणत माहवशने कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे.
माहवशने शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रीती झिंटा, पंजाब किंग्सचे काही स्पर्धक, श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल दिसत आहेत. क्रिकेटपटू युजवेंद्र चहलबरोबरच्या वाढलेल्या जवळीकतेमुळे आरजे माहवश सध्या देशभरात चर्चेत आहे.
दरम्यान, १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलचे विजेतेपद मिळवलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे स्वागत करण्यासाठी बुधवारी (४ जून) लाखोंच्या संख्येत त्यांचा चाहता वर्ग बंगळुरूच्या रस्त्यावर जमला होता. मात्र, या उत्सवाला गालबोट लागले. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी मैदानाबाहेर गर्दी आटोक्याच्या बाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला.