‘सा रे गा मा पा लिटील चॅम्प्स २०१७’चा विजेता कोण होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांनाच होती. १० महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या या कार्यक्रमाला अखेर विजेते मिळाले. साधारणपणे कोणत्याही रिअॅलिटी शोचा एकच विजेता असतो. पण यावेळी या रिअॅलिटी शोचा एक नव्हे तर दोन विजेते होते. जयपुर येथे झालेल्या महाअंतिम सोहळ्यात महाराष्ट्राची अंजली गायकवाड आणि पश्चिम बंगालचा श्रेयन भट्टाचार्य यांना विजेतेपद मिळाले. ‘सा रे गा मा पा लिटील चॅम्प्स’च्या इतिहासात असे पहिल्यांदा झाले की या कार्यक्रमाचे दोन विजेते ठरले. ‘सा रे गा मा पा लिटील चॅम्प्स शो’चे नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि जावेद अली हे महापरीक्षक होते. या तिघांसोबतच अन्य ३० सदस्य हे ‘ज्युरी’ म्हणूनही या शोचा हिस्सा होते. आदित्य नारायणने या शोचे सूत्रसंचालन केले होते.
१२ वर्षांचा श्रेयन मिदनापुर जिल्ह्यातील आहे. त्याच्या सुमधूर आवाजाने त्याने उपस्थितांची मनं जिंकली. श्रेयणने अंतिम सोहळ्यात ‘सूरज डूबा…’, ‘हवाएं…’ आणि ‘जालिमा…’ ही गाणी गायली. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत श्रेयणने सांगितले की, ‘मी जावेद अलीचा फार मोठा चाहता आहे. त्यामुळे जेव्हा जावेदने तू माझ्यापेक्षाही चांगला गातोस असे म्हटले तो क्षण माझ्यासाठी खास होता.’
११ वर्षीय अंजलीचा या शोमध्ये चॅलेंजर म्हणून सहभाग झाला होता. तिच्यातला आत्मविश्वास आणि उत्तम गायकी यामुळे तिने अंतिम सामन्यापर्यंत झेप घेतली. अंजलीने अंतिम सामन्यात ‘दीवानी मस्तानी…’, ‘झल्ला वल्ला…’ आणि ‘मैं कोल्हापूर से आई हूं…’ ही गाणी गायली. अंजली आणि श्रेयन यांच्यासोबत ध्रुन टिचकू, षणमुखप्रिया, सोनाक्षी कर आणि वैष्णव गिरीश या मुलांनीही अंतिम फेरी गाठली होती. अंतिम सामन्याला कपिल शर्मा, भारती सिंग, रवी दुबे आणि पराग त्यागी यांनीही उपस्थिती लावली होती.