लठ्ठपणा/जाडेपण हा विनोदाचा आणि चेष्टेचा विषय तर असतोच, पण या जाडेपणामुळे त्या व्यक्तीला आरोग्याशी संबंधित विविध तक्रारींनाही सामोरे जावे लागते. जाडेपण हे मोठय़ा वयातच येते असे नाही तर सध्या अगदी लहान वयातील मुले-मुलीही जाडेपणाची शिकार झालेले पाहायला मिळतात. अशी मुले त्यांच्या मित्र-मैत्रिणींमध्ये चेष्टेचा विषय ठरतात. बदलती जीवनशैली, फास्ट फूड/जंक फूडचे अतिसेवन, बैठे काम, व्यायामाचा अभाव या मुळे हे जाडेपण येते. सचिन कुंडलकर लिखित आणि दिग्दर्शित आगामी ‘वजनदार’ या चित्रपटात याच जाडेपणावर आणि सडपातळ होण्याचा पण केलेल्या दोन मैत्रिणींची गोष्ट मांडण्यात आली आहे. हा चित्रपट जाडेपणाची चेष्टा न करणारा तर त्यावर हलकेफुलके भाष्य करणारा असून साध्या दिसणाऱ्या व अगदी सर्वसामान्य असणाऱ्यांची बाजू या चित्रपटातून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
‘हॅप्पी जर्नी’, ‘राजवाडे अॅण्ड सन्स’ या चित्रपटानंतर सचिन कुंडलकर पुन्हा एकदा वेगळा विषय आणि मांडणी असलेला चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. याविषयी ‘रविवार वृत्तान्त’शी बोलताना कुंडलकर म्हणाले, समाजात घडणाऱ्या घटनांचा माझ्या मनात नेहमीच विचार सुरू असतो. आपल्या आजूबाजूच्या वातावरणातील गोष्टी, प्रसंग यावर मी चित्रपट करत आलो आहे. ‘वजनदार’ चित्रपटाचा विषयही गेली अनेक वर्षे डोक्यात घोळत होता. हल्ली माणसे ‘आपण कसे आहोत’ यापेक्षा ‘आपण कसे दिसतो’यावर जास्त भर देत असल्याचे पाहायला मिळत आहे. असण्यापेक्षा दिसण्याकडे त्यांचे जास्त लक्ष असते. वजन कमी करण्यासाठी आणि सडपातळ होण्यासाठी दोन मैत्रिणी काय काय करतात त्याचा प्रवास हलक्याफुलक्या पद्धतीने ‘वजनदार’मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जाडय़ा माणसांवरील विनोदी चित्रपट असे त्याचे स्वरूप नाही. तर त्यापेक्षा वेगळे काही यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
चित्रपट लिहिताना आणि दिग्दर्शक म्हणून विचार करतानाच मला चित्रपटातील पात्रे दिसायला लागतात. सई ताम्हणकर ही एक गुणी अभिनेत्री आहे. ‘क्लासमेट’, ‘बालकपालक’ हे तिचे चित्रपट पाहिल्यानंतर तिच्याबरोबर काम करायचे ठरविले होते. ‘हॅप्पी जर्नी’च्या निमित्ताने प्रिया बापटबरोबर काम केले होते. या चित्रपटानंतर एक आव्हानात्मक भूमिका तिच्याकडून करवून घ्यायची होती. या दोघींकडे ‘वजनदार’बाबत विचारणा केली, चित्रपटासाठी तुम्हा दोघींनाही वजन वाढवायला लागेल, याचीही कल्पना दिली. त्या दोघींनी माझ्यावर पूर्णपणे विश्वास टाकून हा चित्रपट स्वीकारला असल्याचेही कुंडलकर यांनी सांगितले.
ही केवळ जाडय़ा दिसणाऱ्या, गब्दुल असणाऱ्या मुलींची गोष्ट नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रत्येक व्यक्तीने स्वत:वर प्रेम करायला तर शिकावेच, पण आपल्या स्वत:ला आपण आहोत तसे स्वीकारावे, स्वत:तील चांगल्या गुणांकडे, गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे. स्वत:ला मापात बसविण्याचा प्रयत्न करू नका, निरोगी राहा असे सांगण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही कुंडलकर म्हणाले.
आपल्या भूमिकेविषयी माहिती देताना सई ताम्हणकर म्हणाली, या चित्रपटात मी ‘कावेरी’ही भूमिका केली आहे. ही मुलगी माहेरी मोकळ्या वातावरणात वाढलेली असली तरी हिला फारसे कोणी मित्र नाहीत. या मुलीचे लग्न एका कर्मठ आणि पारंपरिक विचार असलेल्या कुटुंबातील मुलाशी होते. ‘स्ट्रॉबेरी फॉर्ममध्ये असलेली हिरवी मिर्ची’ म्हणजे मी आहे. माझे पात्र हे समाजात आजुबाजूला वावरणाऱ्या सर्वसामान्य मुलींचे प्रातिनिधिक उदाहरण असून त्या सर्वसामान्य मुलींचीच ही गोष्ट आहे. हा चित्रपट म्हणजे केवळ जाडय़ा मुलींची गोष्ट नाही तसेच तो फक्त विनोदीही नाही. सर्व प्रकारच्या भावभावना यात पाहायला मिळणार आहेत. तर प्रिया बापटने सांगितले, चित्रपटात मी ‘पूजा’ ही भूमिका साकारली आहे. प्रत्येक माणसाला स्वत:बद्दल कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा न्यूनगंड हा असतोच असतो. चित्रपटाच्या माध्यमातून ‘स्वत:वर प्रेम करायला शिका, स्वत:तील चांगल्या गोष्टी पाहा, स्वत:ला जसे आहोत तसे स्वीकारा आणि आयुष्यात निरोगी राहा’ हे सांगण्याचा आमचा प्रयत्न आम्ही केला आहे.
लॅण्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात सई व प्रियासह सिद्धार्थ चांदेकर, चेतन चिटणीस, क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा चिराग आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबर रोजी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.