Saif Ali Khan Revealed One Female Producer Put Forward Weird Condition : सैफ अली खान हा बॉलीवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. परंतु, त्याची कारकीर्द सुरुवातीला सोपी नव्हती. आई प्रसिद्ध अभिनेत्री असूनही सैफला बॉलीवूडमध्ये करिअर बनवण्यासाठी संघर्ष करावा लागला, तसेच त्याला बॉलीवूडमध्ये अनेक विचित्र अनुभवही आले.
सैफने नुकतीच ‘एस्क्वायर इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत सैफने महिला निर्मातीने दिलेल्या अजब ऑफरचा खुलासा केला. सैफने सांगितलं की निर्मातीने त्याला एक हजारांच्या बदल्यात किस करण्याची ऑफर दिली होती. जेव्हा मी तुला एक हजार रुपये देईन तेव्हा गालावर १० किस करायचे, अशी अजब मागणी महिला निर्मातीने सैफकडे केली होती, असा धक्कादायक खुलासा अभिनेत्याने केला आहे.
सैफ त्याच्या बॉलीवूडमधील स्ट्रगलबाबतही बोलला. तो म्हणाला, “मी सेकंड लीड, थर्ड लीड अशा सगळ्या भूमिका केल्या. काही चित्रपट चांगले होते, पण एक वेळ अशी होती जेव्हा एकामागून एक सगळे सिनेमे फ्लॉप होत होते,” सैफने १९९३ साली ‘परंपरा’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘ज्वेल थीफ’सारखे चित्रपट आणि सीरिजद्वारे त्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवरही ओळख मिळाली. आता सैफ ‘हैवान’, ‘जिस्म ३’ या सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सैफ व करीना हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. दोघांमध्ये दहा वर्षांचं वयाचं अंतर आहे. या दोघांची प्रेमकहाणीसुद्धा तितकीच प्रसिद्ध आहे. सैफ व करीना यांची प्रेमकहाणी ‘टशन’ या चित्रपटाच्या सेटवर २००८ साली सुरू झाली. याच चित्रपटाच्या सेटवर दोघोंमध्ये प्रेम फुललं होतं. त्यानंतर ही जोडी अनेकदा एकत्र फिरताना दिसली आणि नंतर काही वर्षांनी दोघांनी २०१२ साली लग्न केलं.
करीनापूर्वी सैफने अभिनेत्री अमृता सिंहबरोबर १९९१ मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर दोघांना सारा व इब्राहिम अशी दोन मुलं झाली, परंतु लग्नाच्या १३ वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर काही वर्षांनी सैफ अली खानने अभिनेत्री करीना कपूरसह लग्न केलं. सैफ व करीना यांना तैमूर व जेह अशी दोन मुलं आहेत.