बॉलीवूड अभिनेता सलमान खानची कथित गर्लफ्रेंड लुलिया वंतूरबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे, जी ऐकून चाहते नक्कीच आनंदी होतील. रोमानियन मॉडेल व गायिका लुलिया वयाच्या ४४ व्या वर्षी अभिनयाच्या जगात प्रवेश करणार आहे.
हे आहे लुलियाच्या शॉर्ट फिल्मचे नाव…
लुलिया वंतूरने अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये तिच्या डान्सने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. आणि आता ती चित्रपटांमध्येही काम करण्यास पूर्णपणे तयार आहे. लुलियाच्या पदार्पणाच्या शॉर्ट फिल्मची घोषणा झाली आहे. लुलिया बॉलीवूड चित्रपटातून नाही तर एका इंग्रजी शॉर्ट फिल्ममधून पदार्पण करणार आहे.
लुलियाने ५ मे २०२५ रोजी चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांची एक पोस्ट रीशेअर केली आहे. या पोस्टमध्ये लुलियाच्या पदार्पणाची बातमी आहे. पोस्टमध्ये लिहिले होते, “लुलिया वंतूर एका इंग्रजी शॉर्ट फिल्ममधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करीत आहे. दिग्दर्शक जो राजन यांनी ‘इकोज ऑफ अस’चे शूटिंग सुरू केले आहे.” ही पोस्ट समोर येताच सोशल मीडियावर या शॉर्ट फिल्मबद्दल चर्चा सुरू झाली.
या अभिनेत्यासोबत करणार काम
‘इकोज ऑफ अस’ ही लुलिया वंतूरची एक इंग्रजी शॉर्ट फिल्म आहे. लुलिया तिच्या पहिल्याच शॉर्ट फिल्ममध्ये मुख्य भूमिकेत आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये तिच्याबरोबर दीपक तिजोरी मुख्य भूमिकेत आहे. लुलिया आणि दीपकव्यतिरिक्त स्पॅनिश अभिनेत्री अलेस्सांड्रा व्हेलन मेरेडिझ या शॉर्ट फिल्ममध्ये दिसणार आहे. अभिनेत्री पूजा बत्रा या शॉर्ट फिल्मची निर्मिती करीत आहे. शेअर केलेल्या दोन फोटोंपैकी पहिल्या फोटोमध्ये लुलिया दीपकला मिठी मारताना दिसत आहे आणि दुसऱ्या फोटोत ती टीमच्या इतर सदस्यांबरोबर दिसत आहे.
लुलिया वंतूर आणि सलमान खान यांच्या नात्याबद्दल अनेक वेळा चर्चा रंगली आहे. मात्र, त्यांनी कधीही यावर वक्तव्य केलेलं नाही. तरीही लुलिया अनेक वेळा सलमान खानला तिच्या करिअरमधील यशासाठी श्रेय देते. सलमानच्या कुटुंबाबरोबर लुलियाचे चांगले संबंध असल्याने सलमान आणि तिच्या नात्याची चर्चा होते.