‘क्योंकि साँस भी कभी बहू थी’ या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये स्मृती इराणी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा शो सुपरहिट झाला होता आणि आता त्याचा दुसरा सीझन आला आहे. स्मृती यांच्या शोचा हा सीझनदेखील खूप लोकप्रिय झाला आहे. त्यांनी अलीकडेच खुलासा केला की, त्यांचा पती झुबिन इराणी यांची त्यांनी अनेक बॉलीवूड स्टार्सशी ओळख करून दिली.
मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत स्मृती यांनी सलमान खानबरोबरच्या त्यांच्या भेटीचा एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, “सलमान आणि माझे पती सेंट झेवियर्समध्ये वर्गमित्र होते. म्हणून जेव्हा झुबिन मला पहिल्यांदा सलमानला भेटायला घेऊन गेले तेव्हा सलीम खानदेखील तिथे होते. ते म्हणाले, “तुला माहीत आहे का तुझा पती माझ्या मुलाशी काय करायचा? तो माझी गाडी चोरायचा आणि गाडी चालवायला जायचा. ते दोघेही खूप खोडकर आहेत. मी तिथे शांतपणे उभी राहून ऐकत होते. सलमान आणि माझे पती डोके खाली ठेवून उभे होते.”
स्मृती यांच्या नवीन शोबद्दल बोलायचे झाले तर, एकता कपूर या शोची निर्मिती करीत आहे. शोमध्ये स्मृती इराणी तुलसीची भूमिका साकारत आहेत; तर अमर उपाध्याय मिहीरची भूमिका साकारत आहेत. चाहत्यांना हा शो खूप आवडतोय.
स्मृती इराणी या एकेकाळी हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा होत्या. अभिनय क्षेत्रात आपल्या अभिनय शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि त्यानंतर त्या काही काळ अभिनयापासून दूर राहिल्या. मात्र, काही महिन्यांपूर्वीच त्यांनी पुन्हा टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक केलं.
गेल्या काही वर्षांत स्मृती इराणी राजकारणात सक्रिय होत्या. त्यामुळे त्यांनी कला क्षेत्रातून काही काळ ब्रेक घेतला होता. मात्र, सध्या स्मृती इराणी तुलसी विराणीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यांच्या ‘क्योंकि साँस भी कभी बहू थी २’ या मालिकेने अवघ्या काही महिन्यातच रेकॉर्ड मोडले आहेत.