Rakesh Poojary Death : लोकप्रिय कन्नड अभिनेता राकेश पुजारीचे निधन झाले आहे. ३३ वर्षीय अभिनेत्याला हृदयविकाराच्या झटका आला आणि त्याची प्राणज्योत मालवली. उडुपी जिल्ह्यात एका मेहंदी समारंभादरम्यान त्याचं निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, राकेशचे मध्यरात्री निधन झाले. त्याने मेहंदी समारंभातील एक गोष्ट त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. तसेच त्याने त्याच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या होत्या. त्यानंतर रात्री त्याचं हृदयविकाराच्या झटक्यने निधन झालं. राकेशच्या निधनानंतर इन्स्टाग्रामवरील त्याच्या या दोन्ही शेवटच्या स्टोरीज व्हायरल झाल्या आहेत.

डेक्कन हेराल्डच्या वृत्तानुसार, राकेश मियार येथील त्याच्या मित्राच्या घरी होता, तिथे तो त्याच्या मित्रांशी बोलत असताना खाली कोसळला. लगेचच त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

कर्कला टाउन पोलीस स्टेशनमध्ये राकेशच्या आकस्मिक निधनासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर चाहत्यांवर व मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे. सर्वजण सोशल मीडियावर पोस्ट करून त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.

‘कांतारा: चॅप्टर १’ मध्ये फेम राकेशने ११ मे रोजी मेहंदी कार्यक्रमाला जाण्यापूर्वी चित्रपटाचे चित्रीकरणही केले होते. चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं शूटिंग पूर्ण झालं आहे. राकेश चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावत होता. अभिनेत्याने निधनाआधी थकवा जाणवत असल्याची तक्रार केली होती, अशी माहिती समोर आली आहे.

२०२० मध्ये ‘कॉमेडी खिलाडीगालू’ हा शो जिंकल्यानंतर राकेश कर्नाटकमध्ये घराघरात लोकप्रिय झाला होता. २०१४ मध्ये ‘कडाले बाजिल’ नावाच्या तुलू रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतल्यानंतर त्याला लोकप्रियता मिळाली होती. राकेशने अमेर पोलीस, उमिल या काही कन्नड आणि तुलू चित्रपटांमध्येही काम केलं होतं. राकेशने विविध कन्नड रिअॅलिटी शोमध्येही काम केलं होतं.