scorecardresearch

“मी तुम्हाला खात्री देते की माझ्याविरुद्ध…”, अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्याच्या बातम्यांवर सोनाक्षी सिन्हाची पहिली प्रतिक्रिया

नुकतंच सोनाक्षीने इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर करत याबाबत निवेदन जारी केले आहे.

Sonakshi Sinha on Non bailable Warrant : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षीच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्याचे बोललं जात आहे. हे संपूर्ण प्रकरण चार वर्षापूर्वीचे आहे. नुकतंच या संपूर्ण प्रकरणी सोनाक्षी सिन्हाने एक अधिकृत वक्तव्य जारी केले आहे. ‘मला त्रास देण्यासाठी हे सर्व केले जात आहे. संबंधित आरोपी माझ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही सोनाक्षी सिन्हाने केला आहे.’

सोनाक्षी सिन्हा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षी सिन्हाच्या विरोधात एक अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्याच्या बातम्यांना वेग आला आहे. नुकतंच सोनाक्षीने इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर करत याबाबत निवेदन जारी केले आहे.

यात ती म्हणाली, “कोणत्याही अधिकाऱ्याची पडताळणी न करता गेल्या काही दिवसांपासून माझ्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्याच्या अफवा मीडियामध्ये पसरत आहेत. याद्वारे मला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी सर्व मीडिया हाऊसेस, पत्रकार आणि वार्ताहरांना विनंती करते की अशाप्रकारच्या खोट्या बातम्या पसरवू नका. कारण या माध्यमातून प्रसिद्धी मिळवणे हा त्या व्यक्तीचा अजेंडा असू शकतो. ती संबंधित व्यक्ती माझ्या प्रतिष्ठेवर पूर्णपणे हल्ला करत आहे. त्याद्वारे प्रसिद्धी मिळवण्याचा आणि माझ्याकडून पैसे उकळण्याचाही तो प्रयत्न करत आहे.”

“हे संपूर्ण प्रकरण मुरादाबाद न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे आणि अलाहाबादच्या उच्च न्यायालयाने याप्रकरणी स्थगिती दिली आहे. न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल माझी कायदेशीर टीम त्याच्यावर आवश्यक ती सर्व कारवाई करेल. पण जोपर्यंत मुरादाबाद न्यायालय या प्रकरणाचा निकाल देत नाही तोपर्यंत यावर माझी एकमेव टिप्पणी असेल. त्यामुळे कृपया यासाठी माझ्याशी सतत संपर्क साधू नका. मी घरी आहे आणि मी तुम्हाला खात्री देते की माझ्याविरुद्ध कोणतेही वॉरंट जारी केलेले नाही”, असे सोनाक्षी म्हणाली.

नेमकं प्रकरण काय?

मुरादाबाद येथील रहिवासी असलेल्या प्रमोद शर्मा यांनी २०१८ मध्ये मुरादाबादमधील कटघर पोलिस ठाण्यात सोनाक्षी सिन्हाविरोधात गुन्हा दाखल केला होता. यात तिच्यासोबत पाच जणांनी ३६ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. सोनाक्षीला दिल्लीतील एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी आगाऊ २८ लाख रुपये रक्कम घेतली होती. मात्र ती त्या ठिकाणी हजर राहिली नाही.

“मी मराठी कुटुंबातून आलेली असल्याने…”, माधुरी दीक्षितने सांगितला सिनेसृष्टीत पदार्पण करतानाचा ‘तो’ धक्कादायक अनुभव

सोनाक्षी सिन्हा पैसे घेऊन कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याबद्दल तिच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मुरादाबाद येथील न्यायालयातून तिच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आले. सतत न्यायालयात हजर न राहिल्याने हे वॉरंट बजावण्यात आल्याचा दावा केला जात आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी येत्या २४ एप्रिलला होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sonakshi sinha on non bailable warrant actress sonakshi sinha issues an official statement on the non bailable warrant rumours nrp