प्रत्येक क्षण खास हवा – ‘सूर नवा, ध्यास नवा’

मराठी संगीत क्षेत्रात सध्या महत्त्वपूर्ण कामगिरी करत असलेल्या पंधरा रत्नांमध्ये रंगणार चुरस.

सूर नवा, ध्यास नवा

संगीत म्हणजे ध्यास, संगीत म्हणजे तपस्या आणि संगीत म्हणजे निखळ आनंद. ‘प्रत्येक क्षण खास हवा’ या सूत्रावर आधारित चैतन्यपूर्ण गाण्यांचा नवा सांगीतिक कार्यक्रम कलर्स मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या रंगमंचावर सप्तसुरांच्या दुनियेतील नवनवे अविष्कार प्रेक्षकांसमोर त्यांचेच काही लाडके गायक सादर करणार आहेत. ‘सूर नवा, ध्यास नवा’ या कार्यक्रमाद्वारे रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या महाराष्ट्रातील लोकप्रिय गायकांना एकाच मंचावर आणून त्यांच्यातील चुरस बघण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहे.अभिनेत्री तेजश्री प्रधान पहिल्यांदाच या कार्यक्रमाद्वारे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेला राष्ट्रीय पुरस्कार विजेता महेश काळे तसेच हरहुन्नरी अदाकार अवधूत गुप्ते, स्टनिंग लूक आणि रॉकिंग सूर यांचे फ्युजन असलेली रॉकस्टार शाल्मली खोलगडे या कार्यक्रमाचे परीक्षक असणार आहेत. उत्तमातून उत्तम सूर शोधण्याचा हा ध्यास १३ नोव्हेंबरपासून सोम ते बुध रात्री ९.३० वा. सुरु होईल.

मराठी संगीत क्षेत्रात सध्या महत्त्वपूर्ण कामगिरी करत असलेली पंधरा रत्नं घेऊन कलर्स मराठीने या मैफिलीचा घाट घातला आहे. या १५ रत्नांनी आपल्या आवाजाने महाराष्ट्रात जरी ओळख निर्माण केली असली तरीही सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाच्या मंचावर सगळेच जण आपला एक नवा सूर शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहेत. या १५ स्पर्धकांमध्ये वैशाली माडे, प्रसेनजीत कोसंबी, श्रीरंग भावे, जुईली जोगळेकर, ज्ञानेश्वर मेश्राम, प्रल्हाद जाधव यांसारखे अजूनही काही गायक असणार आहेत.

कार्यक्रमाविषयी महेश काळे म्हणाला की, ‘या रिअॅलिटी शोच्या प्रवासामध्ये मी अगदीच नवखा आहे. या कार्यक्रमामध्ये आलेली ही गायक मंडळी अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून आलेली आहेत. पण, एक गोष्ट मी आवर्जून सांगेन या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला उत्तम गाणी ऐकायला मिळणार असल्याचा मला नितांत आनंद आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे सानिध्य मला लाभले हे माझं भाग्य, त्यांच्याकडून मला शिकायला मिळालेल्या अमुल्य गोष्टी या कार्यक्रमाद्वारे मी स्पर्धकांना देण्याचा प्रयत्न करेन.’

अवधूत गुप्ते म्हणाला की, ‘आजपर्यंत बऱ्याच कार्यक्रमांद्वारे महाराष्ट्रातल्या अनेक मुलांना त्यांची स्वप्नं साकारण्याची संधी मिळाली, त्यांचे कौतुक देखील झाले. रिअॅलिटी कार्यक्रमांनी चांगले गायक तर दिलेच पण या कार्यक्रमांमुळे श्रोत्यांना काय ऐकावं हे देखील समजलं. पण, हा कार्यक्रम वेगळा असेल. कारण इथे असलेल्या प्रत्येक गायकाने संगीत क्षेत्रामध्ये एक विशेष टप्पा पार केला आहे, ज्याला स्वत:ची अशी ओळख आहे आणि या कार्यक्रमामध्ये तो आता त्याच्यामधलाच एक नवीन सूर शोधणार आहे. यामुळे मी कार्यक्रमामध्ये त्यांचा मित्र आणि मार्गदर्शक असेन.’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Soor nava dhyas nava new musical reality show on colors marathi

ताज्या बातम्या