गेल्या काही वर्षांपासून दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. समांथा रुथ प्रभू, नयनतारा, रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडा, विजय सेतुपति अशा अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी बॉलीवूडमध्ये स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन देखील बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. नुकतीच अल्लू अर्जुनने एका बॉलीवूडमधील सुपरस्टारची गुपचूप भेट घेतली, ज्याचा फोटो व्हायरल झाला आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने बॉलीवूडचा मिस्टर परफेक्ट आमिर खानची भेट घेतली आहे. आमिर खानच्या घरी अल्लू पाहायला मिळाला. दोघांच्या या गुपचूप भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं असून अल्लू अर्जुन आमिरच्या सोबतीने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

अल्लू अर्जुन व आमिर खानच्या या गुपचूप भेटीबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही. पण, ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, आमिर खानच्या निर्मिती खालेली चित्रपटातून अल्लू अर्जुन लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करू शकतो. यापूर्वी अल्लू अर्जुन व आमिर २०२३मध्ये एकत्र दिसले होते. एका वेडिंग रिसेप्शनमध्ये दोघं चर्चा करताना पाहायला मिळाले होते. तेव्हा देखील दोघं एकत्र चित्रपट करणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता नुकत्याच झालेल्या भेटीमुळे या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. अल्लू व आमिरवर सध्या सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

जेव्हा अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ प्रदर्शित झाला होता, तेव्हा आमिरने या ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळेस अल्लू अर्जुनने आमिरचे आभार व्यक्त केले होते. दरम्यान, सध्या आमिर खान ‘सितारे जमीन पर’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. हा चित्रपट २० जूनला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो महाभारतावर आधारित असलेल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. याविषयी काही दिवसांपूर्वी आमिर म्हणाला होता की, या चित्रपटासाठी तो अभिनेत्रीच्या शोधात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अल्लू अर्जुनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो इटलीमध्ये नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाचं नाव AA22 आहे. तसंच अल्लू ‘पुष्पा ३’ चित्रपटातही पाहायला मिळणार आहे.