छोट्या पडद्यावरील ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ या रिअॅलिटी शोने अनेकांची मने जिंकली आहेत. आपल्या अप्रतिम आवाजाने त्यातील बालस्पर्धकांनी परीक्षक, ज्यूरी आणि प्रेक्षकांवर आपला प्रभाव टाकण्यात कोणतीही कमतरता शिल्लक ठेवलेली नाही. तसेच कार्यक्रमात वेळोवेळी विशेष पाहुणे म्हणून सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटी तार्‍यांचे देखील लक्ष वेधून घेतले आहे. या कार्यक्रमाच्या येत्या भागांमध्ये बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक प्रसिध्द अभिनेत्यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करण्यासाठी लोकप्रिय असलेले आणि पार्श्वगायक म्हणून ओळखले जाणारे सुदेश भोसले येणार आहेत. दरम्यान ते ‘जुम्मा चुम्मा’ या अतिशय लोकप्रिय गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळचा एक किस्सा सांगणार आहेत.

‘जुम्मा चुम्मा’ या गाण्याविषयी बोलताना सुदेश भोसले यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. “या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी अंतिम तालीम सकाळी ९ वाजल्यापासून सुरू झाली होती. मी तेव्हा नवखा होतो. आमचं गाण्याच रेकॉर्डिंग सुरु होतं. रेकॉर्डिंग सुरु असलेल्या स्टुडिओच्या शेजारीच आणखी एक स्टुडीओ होता. त्या स्टुडिओत अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते” असे सुदेश यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, ” स्टुडिओ शेजारीच असल्यामुळे अमिताभ हे मधल्या ब्रेकमध्ये आमच्या इथे येणार होते. मी तेव्हा नवखा असल्याने ते आले की मला दडपण येत असे. त्यामुळे त्या दिवशी मी काहीच खालले नव्हते. तेव्हा मी १७ तासांच्या अवधीत तब्बल २५ कप चहा प्यायलो होते. पण कविता कृष्णमूर्ती यांनी मला आधार दिला होता. अखेरीस पहाटे २ वाजता या गाण्याचे रेकॉर्डिंग संपलं” असे त्यांनी म्हटले.