Sumeet Raghvan X post on Toll Free : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबईच्या वेशीवरील पाच टोलनाक्यांवरील टोल लहान वाहन चालकांना माफ केल्याची घोषणा केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयामुळे मुंबईत दररोज ये- जा करणाऱ्या अडीच ते तीन लाख वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. परंतु, यामुळे टोलनाक्यांवर लांबच्या लांब रांगा लागत असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात मराठी अभिनेता सुमीत राघवन याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना टॅग करून आपला संताप व्यक्त केला आहे.
ठाणे, कल्याण, नवी मुंबई, वसई या मुंबईनजिकच्या मोठ्या शहरांमधून नोकरीसाठी मुंबईत येणाऱ्यांना या टोलचा भुर्दंड पडत होता. याविरोधात ठाणेकरांनी अनेकदा आंदोलने केली, न्यायालयीनही लढा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: पथकर हटविण्याची आंदोलन करीत उच्च न्यायालयात याचिका केली होती. मनसेनेही टोल रद्द करण्याची मागणी केली होती. पथकर हटविल्यास महामंडळाला आर्थिक फटका बसेल आणि नुकसान भरपाई द्यावी लागेल अशी भूमिका घेत सरकारने या मागण्या फेटाळल्या होत्या. मात्र आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाचही प्रवेश मार्गांवरील टोल वाहनांसाठी माफ करण्यात आला. परंतु, ही टोलमाफी अधिक डोकेदुखी ठरली आहे.
हेही वाचा >> सुमीत राघवनने मानले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार, कारण…
अभिनेता सुमीत राघवन म्हणाला, “आम्हाला टोल माफीचे गाजर नको. परिस्थिती जास्त बिकट झाली आहे, तुमच्या ह्या टोल माफीच्या निर्णयामुळे. प्रत्येक लेनमध्ये वाट्टेल तशी जड वाहनं घुसली आहेत. २५/२५ मिनिटं लागतायत दहिसर टोल पार करायला.”
आम्हाला टोल माफीचे गाजर नको.
परिस्थिती जास्त बिकट झाली आहे तुमच्या ह्या टोल माफीच्या निर्णयामुळे.
प्रत्येक lane मध्ये वाट्टेल तशी जड वाहनं घुसली आहेत.
२५/२५ मिनिटं लागतायत दहिसर टोल पार करायला.@mieknathshinde @Dev_FadnavisThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) October 26, 2024
राज्य सरकारचा निर्णय काय?
१४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून मुंबईत हलक्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. हलक्या वाहनांसह शाळेच्या बस आणि एसटी यांनाही पथकरातून सूट आहे. अवजड वाहने, ट्रक्स, प्रवासी बसेसना टोल भरावा लागेल. यामुळे टोलनाक्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु, कोणत्याही लेनमधून जड वाहनं जाऊ लागल्याने इतर हलक्या वाहनांना प्रतिक्षा करावी लागत आहे. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या अधिकच जटील झाल्याचं म्हटलं जातंय.