सुनील ग्रोव्हर हे नावच त्याच्यामागच्या वलयाची कल्पना देण्यासाठी पुरेसं आहे. सुनील ग्रोव्हर आज त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करीत आहे. कधी डॉ. मशहूर गुलाटी, कधी गुत्थी, तर कधी रिंकू भाभी या भूमिकेत लोकांना हसवणारा सुनील ग्रोव्हर प्रत्येक भूमिकेत इतक्या चांगल्या प्रकारे उतरतो की, पडद्यावर स्त्रीच्या भूमिकेत दिसणारा हा अभिनेता प्रत्यक्षात पुरुष आहे याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही. सुनील जेव्हा जेव्हा तो गुलाटी, कधी गुत्थी किंवा कधी रिंकू भाभीच्या भूमिकेत दिसला तेव्हा तेव्हा त्याने प्रेक्षकांना खूप हसवले.
सुनील ग्रोव्हरने विनोदी अभिनयातून खूप मोठे यश मिळवले आहे; परंतु त्या यशामागील इंडस्ट्रीतील त्याचा प्रवास सोपा नव्हता. प्रेक्षकांमध्ये आपली ओळख निर्माण करण्यापूर्वी, त्याला अनेक वेळा नकाराचा सामना करावा लागला. हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील मंडी डबवाली या छोट्याशा गावात राहणारा सुनील ग्रोव्हर, प्रत्येक अभिनेत्याप्रमाणे मोठी स्वप्ने घेऊन मुंबईत आला होता. त्याला लहानपणीच अभिनयाची सवय लागली. सुनील ग्रोव्हर अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांचे चित्रपट पाहत मोठा झाला आणि येथूनच त्याच्यात अभिनयाची जाण निर्माण झाली.
जेव्हा सुनील ग्रोव्हर मोठी स्वप्ने घेऊन स्वप्नांच्या शहरात मुंबईत पोहोचला तेव्हा त्याच्या खिशात फक्त ५०० रुपये होते. त्याला एक वर्ष काम मिळाले नाही आणि नंतर त्याने त्याची सर्व बचत एक वर्ष स्वप्नांच्या शहरात बसून खर्च केली.
अनेक नकारांना तोंड दिल्यानंतर, अभिनेत्याला एका शोची ऑफर मिळाली आणि त्याने त्यात तीन दिवस काम केले; परंतु तीन दिवसांनंतर त्याला अचानक एका रात्रीत काढून टाकण्यात आले. शोमधून अभिनेत्याला काढून टाकण्याचे कोणतेही कारण देण्यात आले नाही. सुनील ग्रोव्हरला हळूहळू काम मिळू लागले; पण तो महिन्याला जेमतेम ५०० रुपये कमवू शकत होता. समस्या इतकी गंभीर झाली होती की, त्याला जेवणही परवडत नव्हते. अशा परिस्थितीत कपिल शर्माचा शो सुनील ग्रोव्हरच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला.
कपिलच्या शोने सुनील ग्रोव्हरला रातोरात स्टार बनवले. गुत्थी आणि डॉ. मशहूर गुलाटी यांच्या भूमिकांमुळे तो घराघरात लोकप्रिय झाला. तो एका रात्रीत प्रसिद्ध झाला आणि त्यामुळे त्याच्यासाठी अभिनयाच्या जगात अनेक दारे उघडली. विनोदाबरोबरच सुनील ग्रोव्हरने अनेक प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि विनोदी कलाकार असण्यापलीकडे त्याने गंभीर भूमिकांमध्येही स्वतःला सिद्ध केले आहे. ‘गब्बर इज बॅक’, ‘जवान’, ‘भारत’, ‘बागी’ व ‘गुड बाय’ मध्ये या भूमिका त्याने खूप गंभीरपणे साकारल्या.
स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीत नाव कमावलेला सुनील ग्रोव्हर आज कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. आज हा अभिनेता एका कॉमेडी शोमधील एका एपिसोडसाठी २५ लाख रुपये घेतो. सुनील ग्रोव्हरचे मुंबईत एक आलिशान घर आहे, ज्याची किंमत सुमारे २.५ कोटी रुपये आहे. त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. ‘इडियॉटिक मीडिया’नुसार, सुनील ग्रोव्हर एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी ५-१० लाख रुपये घेतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनील ग्रोव्हरची एकूण संपत्ती सुमारे २४ कोटी रुपये आहे.