Popular Actress Exit From Serial Shiva: कलाकार जेव्हा एखादे पात्र साकारतात, तेव्हा त्या पात्राला एक वेगळी ओळख देतात. अमुक एक पात्र म्हणजे एखादी व्यक्ती हे समीकरण प्रेक्षकांच्या मनात स्पष्ट असतं. आजवर चित्रपट, मालिकांमधील अनेक अनेक कलाकार आहेत, ज्यांना एखाद्या पात्रामुळे मोठी ओळख मिळालेली असते.
आता शिवा मालिकेतील सर्वच पात्रांनी त्यांची ओळख निर्माण केली आहे. धाडसी, तितकीच प्रेमळ शिवा ही भूमिका अभिनेत्री पूर्वा कौशिकने साकारली आहे. तर शाल्व किंजवडेकरने आशू ही भूमिका साकारली आहे. सिताई ही भूमिका मीरा वेलणकर दिसल्या. त्याशिवाय मालिकेतील रामभाऊ, ऊर्मिला, लक्ष्मण, चंदन, दिव्या, बाईआजी, पाना गँग, शिवाची आई, कीर्ती अशी सगळीच पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात.
मालिकेतील सर्वच पात्रांचे मोठे कौतुक होताना दिसते. मात्र, सिताई व आशू यांचे नाते, त्यांच्यातील बॉण्डिंग विशेष लक्ष वेधून घेताना दिसते. सिताई तिच्या मुलाला कोणत्याही संकटाला सामोरे जावे लागू नये यासाठी सतत प्रयत्न करताना दिसते. तर आशूदेखील त्याच्या आईला त्याच्यामुळे दु:ख होऊ नये, तिला वाईट वाटू नये म्हणून अनेक गोष्टी करताना दिसतो. या सगळ्यात सिताई अनेकदा इतरांशी कठोर वागताना दिसते. पण, आशूसाठी तिला इतरांसाठीची प्रतिमादेखील मान्य असते.
‘शिवा’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट
आशूबरोबर असलेल्या नात्याबरोबरच सिताई व शिवा या सासू-सुनेचे नातेदेखील सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सुरुवातीला सिताईला शिवा सून म्हणून मान्य नव्हती. मात्र, कालांतराने त्यांच्यातील नाते घट्ट झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्यांतील बॉण्डिंगची मोठी चर्चा होताना दिसली. आता सिताई ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मीरा वेलणकर यांनी या मालिकेतून एक्झिट घेतल्याचे समोर आले आहे.
अभिनेत्री मीरा वेलणकर यांनी शिवा या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या सिताईच्या पात्राचे काही फोटो व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केले. यामध्ये त्यांच्याबरोबर मालिकेतील इतर कलाकार देखील दिसत आहेत. विविध सीनदरम्याचे हे फोटो, व्हिडीओ आहेत. हे फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले, “सिताई माझ्यासारखी नाही. पण ते म्हणतात ना की, तुम्ही त्या पात्रासारखे बनता. गेल्या दीड वर्षात असंच काहीसं घडलं आहे. त्यातील प्रत्येक क्षण मी माझ्या मनात साठवून ठेवला आहे.”
“आता कदाचित मी नवीन प्रवास सुरू करेन. सिताईची मला खूप आठवण येईल. पण, मी नवीन संधी, नवीन पात्र, नवीन भूमिका आणि नवीन सुरुवात करण्याकडे उत्सुकेने बघत आहे. मी या सगळ्यासाठी खूप कृतज्ञ आहे. “
त्यांच्या या पोस्टवर मालिकेतील कलाकारांनी भावूक कमेंट्स केल्या आहेत. शाल्व किंजवडेकरने लिहिले, “सिताई तुझी आठवण येत आहे. आता जेवायला भेटूया”, असे लिहीत त्याने हार्ट इमोजी शेअर केले. पूर्वा कौशिकने तुमची आठवण येत आहे, असे लिहिले. मानसी सुरेशने लिहिले, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणखी एका अभिनेत्रीने लिहिले, “मला तुमची खूप आठवण येईल. तुमच्याशिवाय सेटची कल्पना करणे कठीण आहे.” तर चाहत्यांनीदेखील सिताईची आठवण येईल, असे लिहिले आहे.




आता अभिनेत्री कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.