‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेची कथा कलाकारांचा अभिनय आणि या मालिकेत दाखवले जाणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना चांगलेच आवडत आहेत. या मालिकेत नुकतंच अक्षरा आणि अधिपती यांचं लग्न झालं. तर आता ते दोघं जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी जाणार असल्याचं मालिकेत दाखवण्यात येणार आहे. त्यानिमित्त शिवानीने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
या मालिकेत अक्षरा ही भूमिका शिवानी रांगोळे साकारत आहे तर अधिपतीच्या भूमिकेत ऋषिकेश शेलार दिसत आहे. नुकताच या मालिकेत अक्षरा आणि अधिपती यांचा राजेशाही विवाह सोहळा संपन्न झाला. यांच्या लग्नामध्ये आणि लग्नानंतर अनेक अडचणी येताना दिसत आहेत. अशातच हे दोघं जेजुरीला जाणार आहेत.
या मालिकेच्या नवीन भागाचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर आऊट झाला. त्यामध्ये अधिपती अक्षराला उचलून घेत जेजुरीचा गड चढताना दिसत आहे. या मालिकेच्या शूटिंगसाठी हे कलाकार खरोखरच जेजुरीला गेले होते. तेथील खंडोबाच्या देवळातील एक फोटो शिवानीने शेअर केला. त्या फोटोमध्ये शिवानी पारंपारिक वेशभूषेत दिसत असून तिने कपाळावर भंडारा लावला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, “येळकोट येळकोट जय मल्हार! १७ ऑक्टोबरला ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’चा स्पेशल एपिसोड. नक्की बघा.”
हेही वाचा : “आमचं पहिलं बाळ…” शर्मिष्ठा राऊतने सुरु केली नवी इनिंग, पोस्ट चर्चेत
आता तिने शेअर केलेली ही पोस्ट चांगलेच व्हायरल होत आहे. या भागाच्या प्रोमोमुळे आणि शिवानीच्या या पोस्टमुळे प्रेक्षक या आगामी भागाबद्दल खूप उत्सुकता व्यक्त करताना दिसत आहेत.