Aishwarya And Avinash Narkar : मराठी कलाविश्वात ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्याकडे आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. आजवर अनेक मालिका, चित्रपट तसेच नाटकांमध्ये या दोघांनी काम केलेलं आहे. सध्या अभिनयासह प्रेक्षकांची ही लाडकी जोडी सोशल मीडियावर रील्स व्हिडीओ बनवून सर्वांचं मनोरंजन करताना दिसते. या दोघांच्या रील्स व्हिडीओला चाहत्यांकडून नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळतो. या दोघांनी नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

ऐश्वर्या व अविनाश नारकर नेहमीच मराठीसह, बॉलीवूड अगदी दाक्षिणात्य गाण्यांवर देखील रील्स व्हिडीओ बनवत असतात. नारकर जोडप्याने नुकताच एका लोकप्रिय तामिळ गाण्यावर डान्स केला आहे. यामध्ये या दोघांच्या गोड अशा एक्स्प्रेशन्सनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘वन्स मोअर’ या तामिळ चित्रपटातील ‘वा कन्नम्मा’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच लोकप्रिय ठरलं आहे. हेशम अब्दुल वहाब यांनी हे व्हायरल प्रेमगीत संगीतकार उथारा उन्नीकृष्णन यांच्याबरोबर गायलं आहे. नारकर जोडपं याच गाण्यावर थिरकलं आहे. या गाण्यावर डान्स करताना ऐश्वर्या व अविनाश यांनी खास पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं.

ऐश्वर्या यांनी सुंदर अशी साडी, तर अविनाश नारकरांनी बायकोच्या साडीला कॉन्ट्रास मॅचिंग होईल असा प्रिंटेड कुर्ता यावेळी घातला होता. या जोडप्याच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “वेलकम बॅक ग्रेट कपल विथ ग्रेट रील व्हिडीओ”, “समजलं नाही गाणं पण, डान्स पाहून छान वाटलं”, “खूपच छान”, “एव्हरग्रीन जोडी… किती सुंदर डान्स केला आहे”, “अविनाश दादा तुम्ही ग्रेट आहात” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नारकर कपल कायमच असे नवनवीन व्हिडीओ करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. त्यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अविनाश नारकर सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. तर, ऐश्वर्या नारकरांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला.