‘शार्क टँक इंडिया’चं दुसरं पर्व सुरू झालं आहे. यंदाच्या पर्वात भारत पेचा माजी सह-संस्थापक आणि उद्योजक अश्नीर ग्रोव्हर शार्क म्हणून सहभागी झालेला नाही. अश्नीरला ‘शार्क टँक इंडिया’च्या पहिल्या पर्वामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. पण, मध्यंतरी या शोबदद्ल त्याने केलेल्या वक्तव्यांमुळे तो चर्चेत आला होता. आता त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात त्याने तरुणांना योग्य वयात लग्न करण्याचा सल्ला दिला.

‘द रणवीर शो पॉडकास्ट’मध्ये अश्नीरने हजेरी लावली होती. यादरम्यानची त्याची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. यात त्याने तरुण पिढी उशिरा लग्न करण्याचा निर्णय घेते यावर आक्षेप घेतला. लवकर लग्न केलं तर तुम्हाला पुढील आयुष्य स्वतंत्रपणे जगता येतं आणि तुमच्या आयुष्याला एक दिशा मिळते असं मत त्याने मांडलं.

आणखी वाचा : Shark Tank India 2: कार्यक्रमात लाखांचे व्यवहार करणाऱ्या शार्क्सना कोट्यवधींचा फटका? प्रसिद्ध लेखकाची खळबळजनक पोस्ट

अश्नीर म्हणाला, “लोक उशिरा लग्न करतात, लग्न करतच नाहीत किंवा लग्न करतात पण मुलं होऊ देत नाहीत याबद्दल माझं एक ठाम मत आहे. स्त्री आणि पुरुष या दोघांचंही एक शारीरिक घड्याळ असतं. त्यानुसार तुम्ही लवकर लग्न करा, तुम्ही लवकर मुलं होऊ देण्याचा निर्णय घ्या आणि नंतर आयुष्यात अनेक मोठ्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही मोकळे व्हा. हल्लीची पिढी सगळ्याच बाबतीत उशीर करताना दिसते. त्यासोबतच त्यांना समोरच्या व्यक्तीला वचन देण्याचीही भीती वाटते. त्यांना कधीही कोणालाही कमिटमेंट द्यायची नसते. तुम्हाला एकाच वेळी अनेक व्यक्तींना डेट करायचं असेल तर मग लग्नच नाही करायचं!”

हेही वाचा : Shark Tank India 2: “आमच्यापैकी कोणीही हा शो…” अश्नीर ग्रोव्हरच्या ‘त्या’ वक्तव्यावर अनुपम मित्तलची खरमरीत प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे तो म्हणाला, “मला असं वाटतं की, तुम्ही तुमच्या तरुणपणाचा योग्य उपयोग करून घेतला पाहिजे. योग्य वयात तुम्ही जोडीदार निवडा आणि त्याच्याशी लग्न करा. यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्याचं ध्येय सापडेल. तुम्हाला मुलं झाल्यावर त्यांचीही जबाबदारी तुम्हाला घ्यायची असते त्यामुळे तुम्ही आणखीन जबाबदार बनता. तुमचं लक्ष इतर गोष्टींकडे विचलित होत नाही. जर तुम्ही तीस वर्षाचे असाल, अविवाहित असाल आणि तुम्ही चांगले पैसे कमवत असाल तर तुमच्यावर कोणतीही मोठी जबाबदारी नसते. तुम्ही स्वच्छंदीपणे आयुष्य जगता आणि संसार सुरू करायला उशीर करता. हे लोकांनी करू नये असं मला वाटतं.” आता त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तसंच अनेकांनी अश्नीरचे हे विचार त्यांना पटले असल्याचं ट्वीट करत सांगितलं आहे.