‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्या वर्षभरापासून छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवत आहे. रंजक कथानक व कलाकारांचा उत्तम अभिनय यामुळे अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळवली. गेल्यावर्षी ५ डिसेंबर २०२२ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आहे. आज बरोबर एक वर्षांनंतरही मालिकेने आपलं टीआरपीमधील पहिलं स्थान अबाधित ठेवलं आहे. या मालिकेचं संपूर्ण कथानक सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि मधूभाऊंची केस याभोवती फिरतं. ‘ठरलं तर मग’ने टीआरपीत अव्वल स्थान राखण्याचं संपूर्ण श्रेय या मालिकेच्या कलाकारांबरोबरच याच्या लेखकाचंही आहे. सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची कथा नेमकं कोण लिहितंय जाणून घेऊयात…

‘ठरलं तर मग’ या मालिकेला आज १ वर्ष पूर्ण झालेलं आहे. या निमित्ताने या मालिकेच्या कलाकारांनी खास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. मालिकेचं दिग्दर्शन सचिन गोखलेंनी तर, निर्मिती आदेश बांदेकरांच्या सोहम प्रोडक्शनने केली आहे. ‘ठरलं तर मग’चा प्रमुख आधारस्तंभ आहे याची अनोखी कथा. या कथेचं लेखन ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने केलं आहे.

हेही वाचा : “मज्जाच गेली…”, नम्रता संभेरावची नाटकातून एक्झिट अन् नेटकरी झाले नाराज, विशाखा सुभेदार म्हणाली, “आधीच…”

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात एकूण सहा अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारल्याने यातील नेमकी कोण? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. परंतु, या सहा जणींमध्ये अभिनेत्री शिल्पा नवलकर या उत्तम लेखिका आहे. गेल्या वर्षभरापासून शिल्पा नवलकर, सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या कथेचं अर्थात ‘ठरलं तर मग’चं लेखन करत आहेत. याशिवाय त्यांनी मालिकेत प्रतिमा ही महत्त्वपूर्ण भूमिका देखील साकारली आहे.

शिल्पा नवलकर यांनी या मालिकेचा वर्षभराचा प्रवास एका व्हिडीओच्या रुपात शेअर केला आहे. यामध्ये त्या लिहितात, “आज ‘ठरलं तर मग’ मालिकेला पूर्ण होत आहे १ वर्ष…त्यानिमित्ताने पहा अर्जुन-सायलीचा आतापर्यंतचा प्रवास…या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..!! त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..!”

हेही वाचा : Video : “शाळेचा वर्ग, मैदान अन्…”, सिद्धार्थ चांदेकर रमला जुन्या आठवणीत! म्हणाला, “अडीच रुपयांचा वडापाव…”

View this post on Instagram

A post shared by Shilpa Navalkar (@shilpanavalkarofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेत जुई गडकरी, अमित भानुशाली, केतकी पालव, प्रियांका दिघे, प्रिया तेंडोलकर, सागर तळाशीकर, ज्योती चांदेकर या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.