Actor Firoz Khan Passes Away : ‘भाभीजी घर पर है’ या कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेले अभिनेते फिरोज खान यांचं निधन झालं आहे. अमिताभ बच्चन यांचे डुप्लिकेट म्हणून देखील त्यांना ओळखलं जायचं. फिरोज खान यांच्या निधनाच्या बातमीनंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी ( २३ मे ) सकाळी त्यांना उत्तर प्रदेशमधील बदायूं येथे हृदयविकाराचा झटका आला.

‘इंडिया टीव्ही’ने दिलेल्या माहितीनुसार, २३ मे रोजी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर अभिनेत्याची प्राणज्योत मालवली. उत्तर प्रदेश येथील बदायूं येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते त्यांच्या मूळ गावी म्हणजेच बदायूं येथे राहण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी फिरोज खान गेल्या काही महिन्यांपासून अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचे. ४ मे रोजी पार पडलेल्या बदायूं क्लबच्या मतदार महोत्सवात त्यांनी त्यांचा शेवटचा परफॉर्मन्स सादर केला होता.

हेही वाचा : शाहरुखची प्रकृती कशी आहे? मॅनेजर पूजा ददलानीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, “मिस्टर खान…”

फिरोज खान छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय होते. ‘भाभीजी घर पर है’, ‘जिजाजी छत पर है’, ‘शक्तीमान’, ‘हप्पू की उल्टान पलटन’, ‘साहेब बीवी और बॉस’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. याशिवाय अदनान सामीच्या ‘थोडी सी तू लिफ्ट करा दे’ या गाण्यातही ते झळकले होते. असे हे प्रेक्षकांना कायम खळखळून हसवणारे हरहुन्नरी अभिनेते आज काळाच्या पडद्याआड झाले आहेत. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. दीपिका कक्करपासून अनेक कलाकार त्यांना सोशल मीडियावर फॉलो करतात.

हेही वाचा : “माझी बहीण, सखी, मैत्रीण”, तेजस्विनी पंडितच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; म्हणाली, “तेजू आयुष्यभर…”

हेही वाचा : “लग्नाआधी वर्षभर एकत्र राहिलो, आई-वडिलांमुळे…”; किरण रावचा आमिर खानशी लग्न करण्याबाबत मोठा खुलासा

फिरोज खान यांना बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे डुप्लिकेट म्हणून देखील ओळखलं जायचं. त्यांच्या ४ मे रोजी झालेल्या शेवटच्या परफॉर्मन्समध्ये देखील फिरोज खान यांनी बिग बी यांची मिमिक्री केली होती. याशिवाय ते दिलीप कुमार, शाहरुख खान, धर्मेंद्र, सनी देओल यांची सुद्धा नक्कल करायचे. दरम्यान, फिरोज खान यांचं निधन झाल्यावर त्यांच्या चाहत्यांसह संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली असून त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.