Bigg Boss 19 Pranit More Emotional : ‘बिग बॉस’च्या घरातलं वातावरण हे अनेकदा भांडण आणि वादविवादामुळे तापलेलं असतं. पण, ‘बिग बॉस’ या वातावरणाला शांत करण्याचं कामही विविध टास्कमधून करत असतात. असाच काहीसा टास्क नुकताच झाला. ‘बिग बॉस’च्या गुरुवारच्या भागात दिवाळीनिमित्त घरातील सदस्यांसाठी त्यांच्या प्रिय व्यक्तींकडून भावनिक पत्रं आली होती, जी वाचून अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला.

‘बिग बॉस’ने दिलेल्या या टास्कमध्ये घरात पहिलं पत्र आलं ते प्रणीत मोरेसाठी… प्रणीत मोरेसाठी आलेलं पत्र नेहल चुडासीमाच्या हाती लागलं. मात्र, ते पत्र तिनं उद्ध्वस्त न करता प्रणीतला वाचण्यासाठी दिलं आणि हे पत्र वाचताच सर्वांना हसवणारा प्रणीत ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्यांदाच रडला. घरून आलेलं भावूक पत्र वाचताना त्याला अश्रू अनावर झाले. तसंच इतर सदस्यदेखील आपल्या भावनांना रोखू शकले नाहीत.

प्रणीतसाठी आलेलं पत्र असं होतं की,

प्रिय प्रणीत, तुला ‘बिग बॉस’च्या घरात जाऊन दोन महिने झालेत आणि या दोन महिन्यांत एकही दिवस असा नाही गेला की, आम्हाला तुझी आठवण आली नाही. यंदाची दिवाळी तुझ्याशिवाय अधुरीच आहे. पण, तुला टीव्हीवर बघून आम्हाला खूपच अभिमान वाटतोय. आमच्या भावना या पत्रातून व्यक्त करता येणार नाहीत, पण खरी मैत्री कशी असावी हे तुझ्यामुळे दिसत आहे. मित्रांबरोबर त्यांच्या कठीण काळात ठामपणे उभं राहणं, त्यांना पाठिंबा देणं हे या घरात तू अगदी उत्तम पद्धतीने करत आहेस, जे बघून छान वाटत आहे. आई-बाबा पूजा वगैरे सोडून दिवसभर फक्त तुलाच पाहत असतात. सगळेजण तुला विजेता झालेलं पाहत आहेत आणि तूच विजेता होणार हे नक्की… गौरव खन्नाला खूप धन्यवाद. तो तुझा खरा मित्र आहे. तुमच्या मैत्रीची बाहेर फार चर्चा सुरू आहे. अभिषेक आणि अश्नूर यांनाही खूप प्रेम. त्यांनी दाखवून दिलं की, खरी मैत्री कशी असते. तू असाच खेळत राहा आणि लक्षात ठेव, फक्त आम्हालाच नाही तर या महाराष्ट्राला आणि भारताला तुझा अभिमान आहे. सगळ्यांना खूप खूप प्रेम आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून प्रणीत मोरेची चर्चा आहे. त्याचा खेळ, त्याचा संयम, मैत्री तसंच त्याची विनोदी शैली अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांबरोबरच प्रणीत महाराष्ट्रातील जनतेचंही प्रेम मिळवत आहे. त्याला सबंध महाराष्ट्रातून प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे.

सुरुवातीपासूनच सर्वांना हसवणारा, सर्वांची मस्करी करणारा आणि आपल्या विनोदी शैलीत कोपरखळी देणारा प्रणीत पहिल्यांदाच भावूक झाला. त्याला भावूक झालेलं पाहून इतर सदस्यांनासुद्धा अश्रू अनावर झाले.