Sairaj Kendre Dance Video : “आमच्या पप्पांनी गणपती आणला” या गाण्यावर अप्रतिम हावभाव केल्यामुळे बालकलाकार साईराज केंद्रे रातोरात घराघरांत लोकप्रिय झाला होता. त्याच्या क्युट अन् निरागस एक्स्प्रेशन्सनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. घराघरांत त्याची चर्चा होऊ लागली. यानंतर हळुहळू साईराज प्रसिद्धीझोतात आला अन् त्याची ‘झी मराठी’च्या ‘अप्पी आमची कलेक्टर’ या लोकप्रिय मालिकेत वर्णी लागली.
‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका घराघरांत लोकप्रिय होती. महिन्याभरापूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र, यामध्ये साईराजने बालकलाकार म्हणून साकारलेलं सिंबा ( अमोल अर्जुन कदम ) पात्र प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. याच लोकप्रिय बालकलाकाराने आता संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्यावर “एक नंबर, तुझी कंबर…”, म्हणत जबरदस्त डान्स केला आहे.
साईराज केंद्रेचं इन्स्टाग्राम अकाऊंट त्याचे पालक सांभाळतात. त्यांनी चिमुकल्या साईराजचा सर्वत्र ट्रेंड होत असलेल्या ‘शेकी’ गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे.
या डान्स व्हिडीओमध्ये साईराजचे हावभाव, त्याचा जबरदस्त डान्स, त्याची एनर्जी या सगळ्याच गोष्टी लक्षवेधी ठरल्या आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडत साईराजचं भरभरून कौतुक केलं आहे.
साईराजच्या याच ‘शेकी’ गाण्यावरील डान्स व्हिडीओला अवघ्या दोन दिवसांत ६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय त्याच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या असंख्य कमेंट्स आल्या आहेत. “तू किती गोड आहेस”, “अरे वाह किती मस्त”, “छोटा पॅकेट बडा धमाका”, “अप्पी आमची कलेक्टर ही मालिका आम्ही तुझ्यासाठी पाहायचो”, “तुझ्यासमोर सगळ्या रील्स फिक्या आहेत…किती सुंदर हावभाव”, “Wow खूप छान व्हिडीओ बनवला आहे” अशा असंख्य प्रतिक्रिया साईराजच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, ‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडचं ‘शेकी’ हे नवीन गाणं सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. ‘Shaky’ या नवीन गाण्याचा लेखक आणि गायक स्वत: संजू राठोड असून, या गाण्याची संगीत निर्मिती G-Spark ने केली आहे. या गाण्यात संजूच्या सोबतीला ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री ईशा मालवीय झळकली आहे. सध्या सगळेच नेटकरी ‘शेकी’ या ट्रेंडिंग गाण्यावर ठेका धरत असल्याचं पाहायला मिळत आहे.