सध्या छोट्या पडद्यावर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी विविध सामाजिक व कौटुंबिक विषयावरील मालिका सध्या टेलिव्हिजनवर प्रसारित होत आहेत. यासह काही थ्रिलर मालिका सुद्धा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. या महिन्यात ‘कलर्स मराठी’वर एक नवीन हटके मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे जिचं नाव आहे ‘बाईपण जिंदाबाद’.

स्त्रीशक्तीची अनेकं रूपं आहेत. ती आई आहे जी मुलांच्या आनंदात स्वतःचं आयुष्य शोधते. ती पत्नी आहे जी पतीच्या प्रत्येक संकटात खंबीर उभी राहते, ती सून आहे जी नव्या घरात रुजते, ती मुलगी आहे जी आईवडिलांचं जग उजळवते. ती प्रेम, त्याग, सहनशीलता आणि सामर्थ्याचं मूर्त रूप आहे… पण या सगळ्याच्या पलीकडे तिने स्वत:कडे लक्ष देणंही महत्त्वाचं असतं. हाच प्रवास प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल.

या मालिकेत आपल्या आवडत्या मराठी अभिनेत्री सुकन्या मोने, शुभांगी गोखले, सुचित्रा बांदेकर, क्रांती रेडकर, शलाका पवार, दीपा परब, उर्मिला कोठारे, आणि प्रार्थना बेहेरे झळकणार आहेत. या सर्वजणी एका समान सूत्राने जोडल्या गेल्या आहेत ‘स्त्रीत्वाचा उत्सव’. प्रत्येक अभिनेत्री आपल्या व्यक्तिरेखेतून वेगवेगळ्या भावनांना आकार देते. कधी संघर्षाची कहाणी सांगते, कधी सोडून देण्याचं धैर्य दाखवते, तर कधी जगण्याचा नवा अर्थ शोधते. ही मालिका प्रत्येक मराठी स्त्रीला स्वतःचा आरसा दाखवणारा प्रयत्न आहे.

मालिकेची पहिली कथा ‘असिस्टंट माझी लाडकी’ ही स्वप्नाळू माधवी (सुकन्या कुलकर्णी मोने) हिची आहे जी एका वर्कहोलिक बॉसकडे (प्रार्थना बेहेरे) असिस्टंट म्हणून काम करते. वर्कहोलिक बॉस आणि तिची नवी असिस्टंट एकमेकांना तोडीस तोड ठरणार की त्यांच्यात एक छान मैत्रीचं नातं निर्माण होणार? दोन भिन्न व्यक्तिमत्त्वांचा हा अनोखा दृष्टिकोन अनुभवायला विसरू नका ‘असिस्टंट माझी लाडकी’ या भागात.

‘बाईपण जिंदाबाद’च्या प्रत्येक कथेतून स्त्रीचं अंतर्मन, तिचं धैर्य, आत्मसन्मान आणि स्वतःचा आवाज पुन्हा शोधण्याचा प्रवास दिसतो. तिचं बाईपण म्हणजे फक्त नात्यांचं ओझं नव्हे, तर प्रेम, जीवनसृजन आणि आत्मभानाचं प्रतीक आहे. ही मालिका स्त्रीच्या अश्रूंमागचं सामर्थ्य, शांततेतील आवाज आणि हसण्यातली जिद्द दाखवणारी हृदयस्पर्शी सफर आहे. ‘कलर्स मराठी’ची ही नवी मालिका सांगते “ती फक्त जगत नाही, ती जीवन घडवते… तिचं बाईपण खरंच भारी आहे.”

येत्या २६ ऑक्टोबरपासून, दर रविवारी रात्री ८ वाजता ‘बाईपण जिंदाबाद’ ही मालिका प्रेक्षकांना कलर्स मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.