छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम आवडीने पाहिला जातो. या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. हास्यजत्रेतील हास्यवीर विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. हास्यजत्रेमुळे अभिनेता समीर चौघुलेंच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. अभिनय व विनोदाचं अचूक टायमिंग साधत चौघुले प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतात. समीर चौघुले सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

नुकतंच समीर यांनी सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या यूट्यूबवरील पॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीदरम्यान समीर यांनी त्यांच्या मनोरंजन क्षेत्रातील प्रवासाबद्दल, हास्यजत्रेमुळे मिळालेल्या लोकप्रियतेबद्दल आणि रसिकांच्या प्रेमाबद्दल भाष्य केलं. याबरोबरच इतरही बऱ्याच विषयांवर समीर चौघुले यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. याच मुलाखतीमध्ये आपल्या स्ट्रगलबद्दलही समीर यांनी प्रथमच उघडपणे भाष्य केलं. २५००० रुपयांची नोकरी सोडून समीर यांनी नाटकात यायचं ठरवलं त्यावेळी त्यांनी केलेला संघर्ष, घरच्यांनी दिलेली साथ, आर्थिक चणचण याबद्दल समीर यांनी भाष्य केलं.

आणखी वाचा : ‘यदा कदाचित’सारख्या नाटकाचे ३००० प्रयोग करूनही ओळख न मिळण्याबद्दल समीर चौघुलेंनी केलं भाष्य; म्हणाले…

समीर म्हणाले, “यदा कदाचित नाटक सुरू होतं तेव्हाच मी ‘किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड’ या कंपनीत चांगल्या पोस्टवर नोकरी करत होतो. २००० साली २५००० रुपये पगार असणं हीसुद्धा फार मोठी गोष्ट होती, त्यावेळी नोकरी सांभाळत नाटक करताना माझी होणारी तारेवरची कसरत माझ्या बायकोच्या लक्षात आली व तिनेच मला नोकरी सोडण्यास सांगितलं. कारण त्यावेळी माझी खूप दमणूक होत होती. माझी बायको म्हणायची आपण दोन वेळचा वरण भात नक्की खाऊ एवढं मी नक्की कमावते, त्यामुळे मी अखेर नोकरी सोडली.”

यानंतर नोकरी सोडल्यावर नेमका समीर यांचा संघर्ष कसा होता अन् नोकरी केली असती तर बरं झालं असतं का? याविषयी बोलताना समीर म्हणाले, “सुरुवातीला काही वेळा नोकरी असती तर बरं असतं असे विचार मनात आले. नंतर माझे मीच खर्च कमी केले. नोकरीला जाताना मला फर्स्ट क्लासचा पास ऑफिसकडून मिळायचा, त्यामुळे नंतर मी सेकंड क्लासने जायचो. माझी पत्नी कविता हिला ते बघवायचं नाही तेव्हा तीच मला फर्स्ट क्लासच्या पाससाठी पैसे द्यायची कारण गाड्यांना प्रचंड गर्दी असायची. त्यानंतर कोणत्याही स्टेशनवर उतरल्यावर कुठेही जायचं असेल तर चालत जायचं जेणेकरून पैसे वाचायचे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले, “प्रत्येकाचा एक स्ट्रगल असतो, प्रत्येकजण त्याबद्दल सांगेलच असं नाही. माझ्या घरची परिस्थिती काही बिकट नव्हती, माझी दोन वेळची रहायची खायची भ्रांत होती असला काहीच प्रकार माझ्या बाबतीत नव्हता. त्यामुळे माझ्या परीने मी माझे पैसे वाचवायचो. अशात कधी कधी नाटकांचे पैसे बुडायचे, त्यावेळी ३५०० रुपयांचा माझा EMI होता, त्यावेळी ती किंमत खूप होती. माझी आई खूप लवकर मला सोडून गेली त्यामुळे संपूर्ण जवाबदारी माझ्यावर अन् कवितावर आली. या सगळ्यातून धडपडत शिकत शिकत वर आलो, आणि मला त्याचं फार काही वाईट वाटत नाही.”