‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून ओंकार भोजनेला ओळखले जाते. ओंकार भोजने हा कायमच चर्चेत असतो. कॉमेडी किंग अशी त्याची ओळख सांगितली जाते. काही महिन्यांपूर्वी त्याने झी मराठीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेला रामराम केला. यामुळे ओंकार भोजनेच्या चाहत्यांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली होती. अनेकांनी त्याला ट्रोलही केलं होतं. नुकतंच या सर्व प्रकाराबद्दल महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी स्पष्ट मत मांडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झी मराठीवरील ‘फू बाई फू’ हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे बोललं जात आहे. या कार्यक्रमात अभिनेता ओंकार भोजनेही सहभागी झाला आहे. त्याचे कॉमेडी करतानाचे व्हिडीओही समोर आले होते. यावरुन अनेकांनी त्याला ट्रोल केलं होतं. नुकतंच याबद्दल दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी एका मुलाखतीत भाष्य केले. त्यावेळी त्यांनी ओंकार भोजने हास्यजत्रा का सोडून गेला? याबद्दलही सांगितले.
आणखी वाचा : “२० टक्के वाढीसाठी…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतर ओंकार भोजनेवर चाहते नाराज

सचिन गोस्वामी काय म्हणाले?

“ओंकार भोजने हा उत्कृष्ट नट आहे. तो हास्यजत्रेत जेव्हा आला तेव्हाही त्याच्याकडे उत्तम क्षमता होती. त्याआधीही त्याने काही ठिकाणी काम केली होती. त्याची वैशिष्ट्यं हेरता आली आणि त्यापद्धतीने पेरता आली तर तो उत्तमच ठरणार आहे. तो एका प्रोडक्शनमधून दुसऱ्या प्रोडक्शनमध्ये जाणं यात काही गैर नाही. पण ज्या पद्धतीने लोकांनी ते मनाला लावून घेतलंय तसं मला काही फारसं वाटत नाही. एखाद्या नटाने कार्यक्रम सोडून जाणं यात काहीही अडचण नाही.

ओंकार हा चित्रपटासाठी गेला होता आणि तो तेच सांगून गेला होता. आशिष पात्रे हा ओंकारचा फार चांगला मित्र आहे. त्याने त्याला सुरुवातीच्या काळात मदत केली. त्याची जाणीव ठेवणं हे आवश्यक आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा उत्तम सुरु आहे. त्यामुळे आशिषच्या प्रोडक्शनला हातभार लावूया, फेमचा थोडासा वापर करुया, या उद्देशाने आणि मित्राला मदत करण्याच्या हेतून तो कदाचित तिथे गेला असावा.

पण अनेक लोकांनी पैशासाठी गेला वैगरे याबद्दल मला खरंच काहीही माहिती नाही. मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. त्याचे परिणाम काय होतात हा तो संच, चॅनल आणि त्यांचा अंतर्गत भाग आहे. पण आम्हाला कोणालाही त्याबद्दल काहीही राग वैगरे नाही. फक्त त्याने आधी येऊन सांगितलं असतं तर बरं वाटलं असतं. यापूर्वीही त्याने असं केलं होतं. तेव्हा आम्ही त्याला जा असे सांगितले होते. त्यानंतरही तो हास्यजत्रेत आला तेव्हाच त्याचा प्रभाव पडला होता.

कारण ओंकारवर फक्त एकटा तोच काम करत नाही. संपूर्ण टीम त्यावर काम करत असते. लेखकांची आठ जणांची टीम, आम्ही, सहकलाकार हे सर्वजण एकत्र येऊन एक कलाकृती तयार होते. कदाचित तो शो नवीन आहे. त्याला तिथे सेट व्हायला वेळ लागेल. तो होईल त्यात काही दुमत नाही. पण तिथला परफॉर्मन्स आणि या ठिकाणचा परफॉर्मन्स याची तुलना करण्याची माझी इच्छा नाही. पण लोक ट्रोल करतात याचं मला वाईट वाटतं. त्यांना त्यांचे स्वातंत्र्य द्यायला हवं”, असे सचिन गोस्वामी यांनी म्हटले.

आणखी वाचा : ‘फू बाई फू’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, अवघ्या महिन्याभरात कार्यक्रम संपण्याचं कारण आलं समोर

दरम्यान ओंकार भोजनेचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’सोडण्याचा निर्णय त्याच्या चाहत्यांना अजिबात पटला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेकांनी त्यावर टीका केली असून हास्यजत्रामध्ये परतण्याची मागणी केली आहे. तर काहींनी ‘तू चुकीचा निर्णय घेतलास’ असे म्हटले आहे. मात्र अद्याप यावर त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर दुसरीकडे ‘फू बाई फू’हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे तो पुन्हा हास्यजत्रेत परतणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director sachin goswami talk about omkar bhojne maharashtrachi hasyajatra show left for fu bi fu nrp
First published on: 04-12-2022 at 11:33 IST