विनोदाचं अचूक टायमिंग साधत अभिनेता गौरव मोरे गेली अनेक वर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून तो घराघरांत लोकप्रिय झाला. त्याला ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून देखील ओळखलं जातं. सुरुवातीपासून प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर गौरवने आज त्याने यशाचा एवढा मोठा पल्ला गाठला आहे. सध्या तो हिंदी कॉमेडी शो ‘मॅडनेस मचाएंगे’च्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. याशिवाय तो सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. नुकतीच त्याने शेअर केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.

गौरव मोरेने नुकतीच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. या भेटीचा खास फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी अभिनेत्याने त्यांना खास फोटोफ्रेम भेटवस्तू म्हणून गिफ्ट दिली. “माननीय खासदार मुरलीधर (अण्णा) मोहोळ, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि सहकार राज्यमंत्री यांची सदिच्छा भेट” असं कॅप्शन गौरवने या फोटोला दिलं आहे. खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याबद्दल सांगायचं झालं, तर भाजपाचे वॉर्ड अध्यक्ष म्हणून मुरलीधर मोहोळ यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. २०१९ ते २०२२ या काळात ते पुण्याचे महापौर होते. यंदा पहिल्यांदाच ते खासदार झाले आहेत आणि त्यांची या पहिल्याच वर्षी मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.

हेही वाचा : वयात १८ वर्षांचं अंतर, लग्नाला विरोध ते सहजीवनाची ३५ वर्षे! अशोक व निवेदिता सराफ यांची सदाबहार प्रेमकहाणी

गौरव मोरेने खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबर फोटो शेअर केल्यावर त्याच्या सर्व चाहत्यांनी या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “अप्रतिम भेट”, “सुंदर…”, “दादा खूपच भारी” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी गौरवच्या पोस्टवर केल्या आहेत. याशिवाय काही दिवसांपूर्वीच गौरवने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची देखील भेट घेतली होती. या दोघांचे फोटो देखील सर्वत्र व्हायरल झाले होते.

हेही वाचा : “IIT मध्ये पहिल्याच दिवशी ज्युनिअरने स्वतःला संपवलं,” ‘कोटा फॅक्टरी’च्या जितेंद्र कुमारने सांगितला खऱ्या आयुष्यातला अनुभव

View this post on Instagram

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गौरव मोरेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेत्याने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. सध्या तो हिंदी कॉमेडी शो ‘मॅडनेस मचाएंगे’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. याशिवाय गौरव मोरे मुख्य भूमिकेत असलेला ‘अल्याड पल्याड’ चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये गौरवसह मकरंद देशपांडे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.