Jahnavi Killekar Dance Video : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर घराघरांत लोकप्रिय झाली. या शोच्या सुरुवातीला जान्हवीचा खेळ प्रेक्षकांना जराही आवडला नव्हता. मात्र, त्यानंतर निक्कीची टीम सोडल्यावर तिच्या ‘बिग बॉस जर्नी’ला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. प्रत्येक टास्क जान्हवी जिद्दीने खेळायची आणि हळुहळू तिला प्रेक्षकांची पसंती देखील मिळाली.
याशिवाय शोमध्ये असताना जान्हवीने सूरज चव्हाणबरोबर केलेला “कोंबडी पळाली…” हा डान्स सर्वत्र व्हायरल झाला होता. यामुळे जान्हवी उत्तम अभिनेत्री आहेच पण, ती खूप सुंदर डान्स देखील करते हे प्रेक्षकांना पाहायला मिळालं.
काही दिवसांपूर्वीच जान्हवी आपल्या कुटुंबीयांसह गोवा फिरायला गेली होती. बाहेर फिरायला गेल्यावर अभिनेत्री, तिचे पती, मुलगा, जाऊबाई-दीर असे सगळेजण एकत्र धमाल करत असल्याचं पाहायला मिळालं होतं. याचे व्हिडीओ जान्हवीने सोशल मीडियावर शेअर देखील केले आहेत. मात्र, या सगळ्यात जान्हवीने नुकताच शेअर केलेला एक डान्स व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे.
जान्हवी किल्लेकर या व्हिडीओमध्ये तिच्या दोन्ही जाऊबाईंसह जबरदस्त डान्स करत असल्याचं यामध्ये पाहायला मिळत आहे. सध्या इन्स्टाग्राम रील्सवर “नटीनं मारली मिठी” हे गाणं तुफान व्हायरल होत आहे. अनेक मराठी सेलिब्रिटींनी यावर रील्स व्हिडीओ बनवले आहेत. आता या गाण्याची भुरळ जान्हवी किल्लेकरला सुद्धा पडली आहे.
जान्हवीने तिच्या दोन्ही जाऊबाई कोमल व संध्या किल्लेकर यांच्यासह “नटीनं मारली मिठी” या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. या तिघींचं सुंदर बॉण्डिंग, डान्स पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सा पाऊस पाडला आहे. “नादखुळा एक नंबर”, “खूप खूप भारी दीदी”, “जान्हवी ताई तू छान डान्स करतेस आणि तुझ्या जाऊबाई सुद्धा तुला छान साथ देतात” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
जान्हवी हा व्हिडीओ शेअर करत लिहिते, “बाकी काही नाही माझ्या नादी लागल्या बिचाऱ्या… हो पण, दोघींना अजिबात इच्छा नसते हो रील्स करायची…जानू आपण रील्स काढूया संघटनेच्या अध्यक्षा…कोमल आणि संध्या”
दरम्यान, अभिनेत्री जान्हवी किल्लेकरच्या या दोन्ही जाऊबाईंनी तिला ‘बिग बॉस मराठी’च्या शो दरम्यान देखील खूप पाठिंबा दिला होता.