Vaibhav Mangle Post : गेल्या काही दिवसांपासून इशित भट्ट या १० वर्षीय मुलाची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा चालू आहे. इशित ‘कौन बनेगा करोडपती -जुनियर’ या सेगमेंटमध्ये सहभागी झाला होता. यावेळी हॉटसीटवर बसलेल्या इशितने बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी उद्धटपणे संवाद साधल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. इशितचं हे वागणं नेटकऱ्यांना खटकल्याने गेल्या दोन दिवसांत हा व्हिडीओ सर्वत्र तुफान व्हायरल होऊन १० वर्षीय इशितला ट्रोल केलं जात आहे.
इशितचे संस्कार, त्याचं बालपण, अलीकडच्या मुलांची मानसिकता याबाबत सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. सुरुवातीच्या चार प्रश्नांची उत्तरं दिल्यावर पाचव्या प्रश्नाला अतिआत्मविश्वास दाखवणारा इशित हरतो आणि त्याला या खेळातून माघार घ्यावी लागते. असं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
यावर आता मराठी अभिनेते वैभव मांगले यांनी पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. “केबीसी’च्या प्रसिद्धीसाठी त्या मुलाचा वापर केला असेल तर आपण एका भीषण वास्तवात आहोत. हकनाक त्या मुलाच्या भविष्याचा बळी दिला आहे.” असं वैभव मांगलेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे आणि सध्या सुरू असलेल्या ट्रोलिंगबद्दल खंत व्यक्त केली आहे. अभिनेत्यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट्स करत त्यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
‘कौन बनेगा करोडपती’मध्ये अमिताभ बच्चन प्रत्येक स्पर्धकाला सर्वात आधी नियम समजावून सांगतात. पण, इशित त्याला नियम समजवण्याआधी मला काहीही सांगू नका मला सगळे नियम माहीत आहेत असं बिग बींना सांगतो. यानंतर प्रश्नांना सुरुवात होते. यावेळी सुरुवातीच्या चार प्रश्नांची ऑप्शन न पाहता इशित उत्तर देतो. पण, पाचव्या प्रश्नाला त्याची कोंडी होते. उर्मटपणे हाच ऑप्शन लॉक करा असा तो बिग बींना चार-पाच वेळा सांगतो आणि शेवटी इशितचं उत्तर चुकतं आणि त्याला खेळ सोडावा लागतो.

अनेकांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ ऑन एअर करणं हे चॅनलच्या हातात होतं, अशा परिस्थितीत चॅनेलने हा भाग प्रसारित न करण्याचा निर्णय घेतला पाहिजे होता असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.