किरण माने यांना ‘बिग बॉस मराठी ४’ने वेगळी ओळख दिली. या कार्यक्रमामुळे त्यांचा चाहतावर्ग प्रचंड वाढला. या पर्वामध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तर अपूर्वा नेमळेकर उपविजेती ठरली आणि अक्षय केळकर या पर्वाचा विजेता ठरला. या कार्यक्रमामध्ये किरण माने, अपूर्वा व अक्षय यांच्यामध्ये नेहमीच वाद होताना दिसले. तर आता हा कार्यक्रम संपल्यावर अनेक दिवसांनंतर ते तिघे पुन्हा एकदा एकत्र आले.
किरण माने व अपूर्वा नेमळेकर सध्या त्यांच्या आगामी ‘रावरंभा’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने या तिघांची भेट झाली. यानिमित्त किरण माने यांनी एक पोस्ट शेअर करत अपूर्वा व अक्षय यांच्याबरोबर असलेल्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे.
किरण माने यांनी त्यांचा अपूर्वा व अक्षयबरोबरचा एक फोटो पोस्ट करत लिहिलं, “टॉप थ्री!’बिग बॉस’च्या घरात संपूर्ण शंभर दिवस राहाणं हे आलेल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं. घरातल्या सोफ्यावर बसून ‘ग्रँड फिनाले’चा नादखुळा माहौल अनुभवणं… युक्ती आणि शक्तीचा मेळ राखून लै लै मेहनतीनंतर ‘शेवटचा दिस गोड’ करणं हे सुख फक्त तिघांच्याच वाट्याला येतं… त्यातले आम्ही ‘टॉप थ्री’ फायनलिस्ट!”
पुढे त्यांनी लिहिलं, “बिग बॉसच्या घरात आम्ही जीव खाऊन भांडलो, वाद घातले, एकमेकांविरोधात रणनीत्या आखल्या, कुस्त्या खेळल्या, कधी हरलो – कधी जिंकलो. परवा ‘रावरंभा’च्या प्रीमियरला मुंबईत एकत्र भेटलो तेव्हा आणखी एक लक्षात आलं… ‘फिनाले’प्रमाणेच हाडवैरी ते दोस्ती हा प्रवास खूप कमी जणांच्या वाट्याला येतो, तो आम्ही तिघांनी केला. आज मनात कुठलंच किल्मिष नाही. असेल तर निखळ मैत्रीच आहे फक्त. भेटलो तेवढ्या कमी वेळात लै धमाल केली आम्ही. खळखळून हसलो, टाळ्या दिल्या… शेवटी फोटोत मध्ये कोण उभे राहणार यावरून अपूर्वाची जाम खेचली… मज्जा. लव्ह यू अक्षय आणि अप्पू.” आता त्यांची ही पोस्ट चर्चेत आली असून त्यांचे चाहते त्यावर कमेंट करत त्यांच्या मैत्रीचे कौतुक करत आहेत.
