Lakshmi Niwas Fame Meghan Jadhav Wedding Date : लोकप्रिय अभिनेता मेघन जाधव लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर रोमँटिक पोस्ट शेअर करत अभिनेत्याने प्रेमाची कबुली दिल्याचं पाहायला मिळालं होतं. आता सध्या मेघनच्या घरी लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

मेघन जाधव सध्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जयंत ही भूमिका साकारत आहे. नुकतीच या मालिकेची संपूर्ण टीम मेघन-अनुष्काच्या केळवणासाठी एकत्र आली होती. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या सेटवर मेघन व अनुष्का यांची चांगली मैत्री झाली अन् पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आता येत्या १६ नोव्हेंबरला ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. जयंतच्या लग्नाच्या तारखेबद्दल दिव्या पुगावकरने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

दिव्या पुगावकर म्हणते, “मेघनचं लग्न होतंय हे ऐकूनच मला खूप भारी वाटलं होतं. खरं सांगायचं झालं तर, मला त्याच्या रिलेशनशिपबद्दल आधीपासून माहिती होतं. म्हणूनच, मी खूप जास्त उत्सुक होते. आम्ही गोव्याला मालिकेच्या शूटसाठी गेलो होतो. १५ तारखेला आमचं पॅकअप झालं. पण, भावना-सिद्धू म्हणजे अक्षया- कुणाल, तुषार सर, हर्षदा ताई यांची रात्रीची फ्लाइट होती. त्यांचे बरेच सीन बाकी होते. त्यामुळे मी आणि मेघन सकाळच्या फ्लाइटने परत घरी निघालो. त्यावेळी बोलता-बोलता मी त्याला विचारलं अरे तुझं लग्न कधी आहे? तर, सुरुवातीला तो फक्त सांगतो…सांगतो असं बोलत होता. तेव्हा मी त्याला म्हणाले मला सांगून ठेव तारीख म्हणजे मी खूप काय-काय तयारी करून ठेवेन.”

“मेघन यानंतर मला म्हणाला मी फार कोणाला सांगितलं नाहीये मी सगळ्यांना दिवाळीनंतर सांगणार होतो. पण, आता मी तुला सांगतोय…१६ नोव्हेंबरला माझं लग्न आहे. मग माझं असं झालं…अरे आता १ महिन्याने तुझं लग्न आहे. तेव्हापासून मेघनच्या लग्नात धमाल करायची हे माझं ठरलंय. अक्षयाला सुद्धा मी आधीच सांगून ठेवलंय की, मी कोणती साडी नेसणार आहे. खरंच आम्ही सगळेच मेघनच्या लग्नासाठी खूप जास्त उत्सुक आहोत.” असं दिव्याने सांगितलं.

दरम्यान, मेघन-अनुष्काच्या केळवणाला जान्हवी, लक्ष्मी, भावना, सिद्धू, वीणा, संतोष, हरीश, वेंकी आणि शांता अशी मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती.