Bhavana Siddhu Lovestory Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’मध्ये भावना-सिद्धू, जयंत-जान्हवी आणि लक्ष्मी-श्रीनिवास या तीन मुख्य जोड्या सध्या गोव्याला फिरायला गेल्याचा सीक्वेन्स मालिकेत चालू आहे. या ट्रिपदरम्यान प्रत्येकाच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळणार आहे. यादरम्यान, जान्हवी-जयंतमध्ये टोकाचे वाद होतात आणि शेवटी जानू विकृत जयंतला सोडून जाण्याचा निर्णय घेते.

दुसरीकडे, भावना-सिद्धूच्या नात्याला नवीन वळण मिळालं आहे. प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेरीस मालिकेत आलेला आहे. सिद्धूचं भावनावर मनापासून प्रेम असतं. मात्र, भावनाने अद्याप तिच्या मनातील सिद्धूविषयीचं प्रेम कुठेही व्यक्त केलेलं नसतं. भावना सिद्धूशी कोणत्याच गोष्टी बोलत नसते. त्यामुळे सिद्धू प्रचंड नाराज होतो.

सिद्धूचं मन आपल्यामुळे दुखावलंय याची जाणीव भावनाला होते. त्यामुळे ती वडिलांशी जाऊन बोलते. यानंतर श्रीनिवास तू आता तुझ्या नवऱ्याशी मोकळेपणाने बोललं पाहिजेस असा सल्ला लेकीला देतात.

यानंतर गोव्याच्या समुद्रकिनारी “माझा जीव तुमच्यात अडकलाय सिद्धीराज” असं भावना त्याला सांगते. बायकोकडून प्रेमाची कबुली मिळाल्यावर सिद्धूचा आनंद गगनात मावेनासा होतो. आता दोघंही घरी परतल्यावर लग्नानंतर त्यांची पहिली दिवाळी साजरी करणार आहेत.

भावना सासरच्या कुटुंबीयांसमोर सिद्धूला पहिलं उटणं लावते. त्याचं औक्षण करते…सिद्धू-भावनामधील प्रेम पाहून आजीची फारच चिडचिड होते. पण, सिद्धूला इतर कोणाविषयी काहीच देणंघेणं नसतं.

दरम्यान, भावना-सिद्धूच्या पहिल्या दिवाळीचा विशेष भाग प्रेक्षकांना २२ ऑक्टोबरला पाहायला मिळणार आहे. आता भावना-सिद्धूचं प्रेम बहरल्यावर सिद्धूची आजी अन् वहिनी कोणता नवीन डाव खेळणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.