अलीकडच्या काळात इन्स्टाग्राम रील्सवर अनेक जुनी गाणी ट्रेंड होत असतात. सध्या अभिनेता गोविंदाच्या ‘आँखे’ चित्रपटातील असंच एक जुनं गाणं सर्वत्र व्हायरल होत आहे. या गाण्यावर बॉलीवूड सेलिब्रिटींपासून ते मराठी कलाविश्वातील कलाकारांपर्यंत सगळेच जबरदस्त डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील कलाकारांनंतर गोविंदाच्या या एव्हरग्रीन गाण्यावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातने जबरदस्त डान्स केला आहे.

वनिताने या डान्सचा व्हिडीओ नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. १९९३ मध्ये म्हणजे आजपासून जवळपास ३१ वर्षांपूर्वी गोविंदाचा ‘आँखे’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये गोविंदासह चंकी पांडे, रितू शिवपुरी, शिल्पा शिरोडकर, शक्ती कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात गोविंदा अन् शिल्पा शिरोडकर यांच्यावर “अंगना में बाबा दुआरे पे मां” हे गाणं चित्रित झालं होतं. हे गाणं आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. कुमार सानू आणि साधना सरगम यांनी या गाण्याला आपला आवाज दिला होता.

हेही वाचा : TRP मध्ये नंबर १ अन्…; ‘ठरलं तर मग’ मालिकेने गाठला नवीन टप्पा, निर्माता सोहम बांदेकर म्हणाला…

आता जवळपास ३१ वर्षांनी पुन्हा एकदा हे गाणं सर्वत्र ट्रेंड होत आहे. त्यामुळे नेटकरी या गाण्यावर गोविंदा अन् शिल्पासारखी हुबेहूब स्टाइल करून थिरकत आहेत. वनिता खरातने या गाण्यावर डान्स करताना पोपटी रंगाची फ्लॉवर प्रिंट असलेली साडी, केसाला वेणी, त्यात लाल रंगाची माळलेली फुलं असा हटके लूक केला होता. त्यामुळे वनिताच्या डान्सप्रमाणे तिच्या लूकचं देखील सर्वांनी कौतुक केलं आहे.

गोविंदाच्या गाण्यावर डान्स करताना वनिताच्या सोबतीला तिचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील सहकलाकार श्रमेश बेटकर होता. “अंगना में बाबा…” असं कॅप्शन यांनी या व्हिडीओला दिलं आहे. याशिवाय हा सुंदर व्हिडीओ अभिनेता पृथ्वीक प्रतापने शूट केला आहे.

सध्या वनिता आणि श्रमेश यांच्या या दमदार व्हिडीओवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहे. अवघ्या तासाभरात या व्हिडीओला २५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही वाचा : “गृहमंत्री महोदय राजीनामा द्या, सोडा खुर्ची…”, वसईत तरुणीची भररस्त्यात हत्या, किरण माने संताप व्यक्त करत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वनिता आणि श्रमेश सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमांतून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. हा कार्यक्रम केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे.