Gaurav More : विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजेच गौरव मोरे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे गौरव घराघरांत पोहोचला. अभिनेता पवई फिल्टरपाडा याठिकाणी राहतो. त्यामुळे गौरवचे चाहते प्रेमाने त्याला ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ असंही म्हणतात.
गौरव मोरेने केवळ मराठीच नव्हे तर, ‘मॅडनेस मचाएंगे’सारखा हिंदी कॉमेडी शो देखील गाजवला आहे. मध्यंतरी अभिनेत्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून प्रेक्षकांचा निरोप घेतला. आजही हास्यजत्रेचे चाहते गौरवला मिस करतात. गेल्या वर्षभरात गौरवचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता महाराष्ट्राला खळखळून हसवणारा हा लोकप्रिय अभिनेता पुन्हा एका छोट्या पडद्यावर कमबॅक करण्याची दाट शक्यता आहे.
गौरव मोरे लवकरच सुरू होणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ या ‘झी मराठी’च्या कॉमेडी शोमध्ये झळकणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. यामागचं कारण म्हणजे, श्रेया बुगडे आणि गौरव मोरे हे दोघंही काही दिवसांपूर्वी श्रेयस तळपदे होस्ट करत असलेल्या ‘चल भावा सिटीत’च्या रंगमंचावर उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी लवकरच काहीतरी नवीन सर्वांसाठी घेऊन येणार आहोत अशी हिंट प्रेक्षकांना दिली होती. त्यामुळे श्रेया आणि गौरव मोरेची जोडी प्रेक्षकांना ‘चला हवा येऊ द्या’मध्ये झळकताना दिसणार का? अशा चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या.
‘झी मराठी’ वाहिनीने नुकताच ‘चला हवा येऊ द्या’ शोचा पहिला टीझर सर्वांसह शेअर केला आहे. या टीझरमध्ये श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके आणि गौरव मोरे या कलाकारांची झलक स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
गौरवने ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात पुष्पा आणि श्रीवल्लीचं स्किट श्रेया बुगडेसह सादर केलं होतं. या स्किटदरम्यानचा गौरवचा फोटो ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्याकोऱ्या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.

यामुळेच गौरव मोरे ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये झळकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. वाहिनी अद्याप याबाबत अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. आता ‘चला हवा येऊ द्या’ शोचा पुढचा प्रोमो प्रदर्शित झाल्यावर कोण-कोणते कलाकार यामध्ये झळकणार? हा शो केव्हापासून सुरू होणार? याबाबत स्पष्टता येईल.