‘या सुखांनो या’, ‘वहिनीसाहेब’, ‘सासूबाई गेल्या चोरीला’, ‘बेरीज वजाबाकी’, ‘फॉरेनची पाटलीण’, अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे गिरीश परदेशी(Girish Pardesi). चित्रपटांबरोबर या अभिनेत्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र, गेल्या १० वर्षांत तो कुठेही दिसला नाही. तो मालिकाविश्वापासून दूर होता. आता एका मुलाखतीत त्याने याचे कारण सांगितले आहे.

काय म्हणाला अभिनेता?

अभिनेता गिरीश परदेशीने नुकताच ‘अल्ट्रा मराठी बझ’बरोबर संवाद साधला. यावेळी त्याला विचारण्यात आले की, १० वर्षांनंतर कमबॅक का करावंसं वाटलं? त्यावर उत्तर देताना अभिनेत्याने म्हटले, “२०१४ साली महेश कोठारेसरांची मी शेवटची मालिका केली होती. स्टार प्रवाहवर ‘जयो स्तुते’ ही मालिका होती. नकारात्मक भूमिका होती; जी नंतर सकारात्मक झाली. एकूणच त्याच्या पूर्वी चॅनेल्स खुली होण्याच्या आधीपासून मी अनेक वर्षे मालिका करत होतो. १९९९ पासून मालिकेत काम करीत होतो. म्हणजे तेव्हा फक्त एकच चॅनेल होतं. ‘अल्फा मराठी’ असं चॅनेल आलं होतं आणि ‘आपलं सह्याद्री’ होतं. ‘सह्याद्री’मध्ये मराठी मालिकांचा स्लॉट फक्त दुपारी असायचा. तेव्हापासून मी मालिकांमध्ये कामं करत असल्यामुळे म्हणजे १९९९ ते २०१४ इतकी वर्षे मी टेलिव्हिजनवर व्यतीत केली. चांगल्या चांगल्या भूमिका केल्या; पण कुठेतरी साचलेपण यायला लागलं होतं. मी पुन्हा पुन्हा तेच तेच माध्यम करतोय. मला टेकिंग कळायला लागलं, लिखाण कळायला लागलं आणि कलाकार म्हणून मी समृद्ध आहे आणि मला ती समृद्धता अनुभवायची होती. अर्थात, पैशाचा प्रश्न होताच. समजा, मी मालिका केल्या नाहीत तर माझ्याकडे अर्थार्जन कुठून येणार आणि मग मी विचार केला की, माझ्याकडे थिएटरचं ट्रेनिंग आहे. मग प्रशिक्षणाकडे माझा मोर्चा वळवला आणि चांगल्या चांगल्या संधी तशा यायला लागल्या. तेव्हा मी ब्रेक घेतला.”

“प्रशिक्षणामध्येसुद्धा मी बरंच काम केलं. तर आयुष्याची वेगळी बाजू मी या १० वर्षांत खूप छान एक्सप्लोअर केली. मी प्राच्यविद्या म्हणजे मी एमए इन इंडोलॉजी (MA In Indology) पारंगत झालो. इंडोलॉजी म्हणजे अश्मयुगीन भारत, सिंधू संस्कृती, वेदकालीन भारत तिथपासून १२ व्या शतकापर्यंत आपला जो भारत आहे, त्याची संस्कृती, तत्त्वज्ञान व इतिहास यांचा अभ्यास मी केला. अय्यंगार योगाचे ट्रेनिंग घेतले.”

‘उदे गं अंबे उदे’ मालिकेतील भूमिकेविषयी बोलताना अभिनेत्याने म्हटले, “महेश कोठारे सरांच्या ऑफिसमधून फोन आला की, तुम्ही काम कराल का? तर मी महेश कोठारे सर, त्यांची टीम, स्टार प्रवाहची टीम या सगळ्यांना ओळखतच होतो. तर मला वाटत होतं की हे छान आहे. ते घरपण कुठेतरी मला जाणवलं म्हणून मी टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा आलो.”

हेही वाचा: रजनीकांत यांच्या लेकीचा घटस्फोट, धनुष व ऐश्वर्या १८ वर्षांच्या संसारानंतर कायदेशीररित्या विभक्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सध्या अभिनेत्याने ‘उदे गं अंबे उदे’ मालिकेतून पुनरागमन केले आहे. त्याच्या अभिनयाचे कौतुक होताना दिसत आहे.