Actor Swapnil Rajshekhar Meets Amitabh Bachchan : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ११ ऑक्टोबरला त्यांचा ८३ वा वाढदिवस साजरा केला. ‘बिग बी’ यांना संपूर्ण मनोरंजन विश्वातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यासह शनिवारी पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सुद्धा अमिताभ बच्चन यांच्यासाठी खास बर्थडे साँग गात शाहरुखने त्यांना शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं.
अमिताभ बच्चन यांनी बॉलीवूडमध्ये ५ दशकांहून अधिक काळ आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिनेता व्हायचं स्वप्न पाहणाऱ्या अनेक नवोदित कलाकारांनी बिग बींकडून प्रेरणा घेत आपल्या मनोरंजनविश्वातील प्रवासाला सुरुवात केली होती. आयुष्यात एकदा तरी या महानायकाला भेटायचं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि लोकप्रिय मराठी अभिनेत्याचं हेच स्वप्न सत्यात उतरलं आहे.
विविध मराठी मालिका व सिनेमांमधून घराघरांत लोकप्रिय झालेले अभिनेते स्वप्नील राजशेखर अलीकडेच ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांना भेटले. या भेटीदरम्यानचा अनुभव स्वप्नील यांनी पोस्ट शेअर करत चाहत्यांना सांगितला आहे.
अमिताभ बच्चन यांची भेट घेतल्यावर स्वप्नील राजशेखर यांची पोस्ट
“मैं आपको छू के देखना चाहता हूँ…
आप सच मे हो… या कोई जादुई अफवाह फैली हुई है पिछले पचास सालों से?!”असं म्हणालो होतो मी त्याला कापऱ्या आवाजात…
त्यावर मनापासून लोभस हसला होता तो…डोळ्यात कौतुक, प्रेम होतं त्याच्या… (मला तरी जाणवलं.. मनाचे खेळ असतील, तरी असोत…)
आणि माझ्या डोळ्यात साक्षात तो दिसल्याचा अविश्वास होता…आपले सगळे मेडिकल प्रोटोकॉल बाजूला ठेवून हात पुढे करत त्या बच्चनी आवाजात तो म्हणाला
“चलिए हाथ मिलाते है…”
माझा थरथरता हात काही क्षण त्याच्या हातात होता… त्याच्या हातात….
त्याला भेटायची संधी यापूर्वी एक दोनवेळा आली होती….
पण माझं धाडस होत नव्हतं….कसं व्हावं… ?
अभिनेता- चाहता एवढंच नाही ना आमचं कनेक्शन!! (त्याच्या बाबतीत एवढ्यापुरतं रहातही नसेल कुणाचं….)
माझं आयुष्य त्याने व्यापलेलं…१९७० च्या मध्यातला जन्म माझा…
म्हणजे अ अमिताभचा, ब बच्चनचा हेच गिरवलंय आमच्या पिढीने…
आणि समज आली तसा मी जो त्याच्या पंथाला लागलो ते आजपर्यंत….तो समोर दिसला तर मला सहन होईल ?! बेभान झालो तर… ?! लहानपणापासूनचं सगळं प्रेम किंवा त्याहूनही गहिरं जे काही आहे ते उचंबळून आलं तर? किंवा समजा त्याला पाहून विरक्तीच आली, ‘पुरे झालं आता… प्रत्यक्ष तो भेटलाय….’
असं वाटुन या भौतिक विश्वातुन मन उडालं तर?! मुलं आहेत, बायको आहे.. म्हातारी आई आहे… त्यांचं कसं?!असे विचार मनात यायचे पूर्वी…
पण आताशा वाटत होतं की एकदा त्याला बघूया तरी… खरंच आहे का तो !! आंखो देखी होऊ दे…
बरं तो आधीसारखा दैवी आणि अप्राप्य राहिलेला नाही आता..
माणूसपणाच्या असंख्य खुणा दिसतायत त्याच्यात…
आता सोसवेल मला…आणि अशात यंदा आमचा रोहित हळदीकर एके दिवशी अचानक म्हणाला “दादा, बच्चनला भेटुया चल…”
मी हिय्या केला…
घरच्यांचा सल्ला घेतला…
आणि भेटलो त्याला… दोनवेळा!!तरीही मी जिवंत आहे… दोनदा त्याचा परिसस्पर्श होऊनही…
अनुभवलेलं सांगतो…
जगात देव आहे…
दरम्यान, स्वप्नील राजशेखर यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी असंख्य प्रतिक्रिया दिल्या आहेत. “सर कसलं भारी लिहिलंय तुम्ही..”, “अमिताभ बच्चन म्हणजे खतरनाक विषय”, “जो कोणी बच्चन यांना भेटेल त्या प्रत्येकाची अशीच भावना असणार आहे” अशा कमेंट्स या पोस्टवर आल्या आहेत. याशिवाय ज्या दोघांमुळे ‘बिग बी’ भेटले त्या रोहित हळदीकर आणि चेतन शर्मा यांनाही स्वप्नील राजशेखर यांनी या पोस्टमध्ये टॅग केलं आहे.