Milind Gawali Reaction On Train Accident : आजवर अनेक मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले लोकप्रिय अभिनेते म्हणजे मिलिंद गवळी. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे ते लोकांच्या घराघरांत अधिकच लोकप्रिय झाले. मालिकेततील त्यांची भूमिका नकारात्मक असली तरी त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी पसंती दिली. आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारे मिलिंद गवळी सोशल मीडियावर ही तितकेच सक्रीय असतात.

सोशल मीडियावर मिलिंद गवळी अनेक जुन्या आठवणी, अनुभव किंवा एखादा प्रसंग चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. त्याचबरोबर ते सामाजिक परिस्थितीवरही त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. अशातच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच या व्हिडीओसह त्यांनी एक पोस्टही शेअर केली आहे आणि या पोस्टमधून त्यांनी रेल्वे अपघाताबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

या पोस्टमध्ये मिलिंद गवळी असं म्हणतात, “गेल्या वीस वर्षांमध्ये ५१ हजार लोकांचा मुंबईत रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. ९ जूनला विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन ट्रेनमध्ये खांबाला लटकलेली माणसे एकमेकांना आदळली आणि १४ जण खाली रुळावर पडली. त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. अनेक वर्षांपूर्वी माझ्या शारदाश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका वर्गीस मॅडम वांद्रे येथे प्लॅटफॉर्मवर पडल्या, त्या अपघातात त्या गेल्या.”

यानंतर ते असं म्हणतात, “आपल्या आजूबाजूला असंख्य लोक आहेत, ज्यांचा कोणी ना कोणीतरी रेल्वे अपघातात दगावला किंवा जखमी झाला आहे. गेल्या पंधरा वर्षांमध्ये रेल्वे अपघातातील १४ हजार मृतदेहांची ओळखच पटलेली नाही असा दावा आहे. जगातली सर्वात सुरक्षित रेल्वे जपानची शिंकानसेन आहे, गेल्या पन्नास वर्षात एकही मृत्यू नाही. शून्य मृत्युदर. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर चीन आणि मग तिसरा नंबर स्वित्झर्लंडचा.”

मिलिंद गवळी इन्स्टाग्राम पोस्ट

यापुढे ते सांगतात, “भारतीय रेल्वे पाकिस्तान-बांग्लादेशपेक्षा बरी आहे एवढंच. ब्रिटिशांनी रेल्वे बांधली. त्यावेळी तीन क्लासेस होते – फर्स्ट क्लास, सेकंड क्लास आणि थर्ड क्लास. मग स्वातंत्र्यानंतर आपण फर्स्ट आणि सेकंड क्लास ठेवला, थर्ड क्लास काढून टाकला. माझं तर असं मत आहे की, सेकंड क्लास पण काढून टाकावा. आपण सगळे भारतीय फर्स्ट क्लासच आहोत.”

यापुढे त्यांनी असं म्हटलं, “भारतामध्ये लोकसंख्या ही सगळ्यात मोठी समस्या आहे. त्यामुळे कितीही सुधारणा केली तरी ती कमीच पडते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोत कुठलाही क्लास नसतो. सगळेच प्रवासी फर्स्ट क्लास असतात. पूर्वी मेट्रोने फार कमी लोक जायचे. मोकळ्या असायच्या. आता परवा अंधेरीच्या पासपोर्ट ऑफिसला मी मेट्रोने गेलो. जाताना मेट्रो वर्सोवावरुन सुटत असल्यामुळे बसायला जागा मिळाली, पण येताना साडेचार वाजता चकाला स्टेशनला रेल्वेला असते तशीच तुडुंब गर्दी होती. एकमेकांना डब्यात कोंबत होते.”

यानंतर ते असं म्हणतात, “मी नशीबवान आहे, मला प्रवासाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे मी त्या चेंगराचेंगरी, गर्दीमध्ये गेलो नाही. अर्थात सगळ्यांकडे तो चॉइस नसतो. आपल्या सगळ्यांना गरीब असो की, श्रीमंत पण माणसांसारखा प्रवास करायला मिळावा. घुरंढोरांसारखा नाही. जगात सगळ्यात महागडं ट्रेनचं तिकीट भारतीय रेल्वे हेरिटेज ऑफ इंडियाचं २० लाख रुपये आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढे मिलिंद गवळी सांगतात, “या ट्रेनमधून मला प्रवास करायला आवडेलच; पण त्याचबरोबर मला सामान्य लोकांसाठी असलेल्या रेल्वेमध्ये सकाळच्या वेळेला दादर स्टेशनला शांतपणे बसून प्रवास करायलासुद्धा आवडेल. जपानसारखं माणसांच्या जीवाची जाणीव आपण ठेवायला हवी. सगळ्यांचा प्रवास सुरक्षितचं करायला हवा आणि यासाठी योग्य ते बदल करायला हवेत.”